मला पुन्हा सत्ता द्या, वृद्धांची पेन्शन पाच हजार करताे! मुख्यमंत्री राव यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:02 AM2023-11-29T09:02:03+5:302023-11-29T09:06:15+5:30
Telangana Assembly Election: तेलंगणामध्ये सत्तेवर आल्यास वृद्धांना दर महिना देण्यात येणाऱ्या पेन्शनची रक्कम दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपयांपर्यंत वाढविली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले.
वारंगल - तेलंगणामध्ये सत्तेवर आल्यास वृद्धांना दर महिना देण्यात येणाऱ्या पेन्शनची रक्कम दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपयांपर्यंत वाढविली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले.
वारंगल येथील सभेत मंगळवारी के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची राजवट पुन्हा तेलंगणात आणूया असा प्रचार काँग्रेस पक्षातर्फे केला जात आहे. मात्र इंदिरा गांधी यांच्या राजवटीत गोळीबार, चकमकी असे अनेक प्रकार घडले होते. १९६९ साली तेलंगणा राज्य निर्मितीची मागणी करणाऱ्या ४०० आंदोलकांचा तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता, असा आरोप के. चंद्रशेखर राव यांनी केला.
ते म्हणाले की, तेलंगणात अनेक बाबतीत देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्नाबाबत तेलंगणा हे गुजरातपेक्षा आघाडीवर आहे. वरंगळ हे तेलंगणातील दुसरे मोठे शहर असून, वरंगळ शहरात आणखी नागरी सुविधा वाढविल्या जाणार आहेत असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
‘...तर मी राजकारण संन्यास घेईन’
- काँग्रेसशासित राज्यांमध्ये तेलंगणापेक्षा एक जरी अतिरिक्त नोकरी दिली गेली असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मुख्यमंत्री राव यांच्या कन्या के. कविता यांनी दिले.
- काँग्रेसने दिलेल्या सहा आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची शपथ तेलंगणातील काँग्रेस नेते भट्टी विक्रमार्का यांनी घेतली होती. त्यावर कविता यांनी प्रतिक्रिया दिली.