Hyderabad Rape-Murder Case : वेगाने सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 09:33 AM2019-12-02T09:33:26+5:302019-12-02T09:33:52+5:30
बलात्कार व हत्या प्रकरण हे फारच भयंकर असून, मला तीव्र वेदना झाल्याचे राव यांनी म्हटले.
हैदराबाद - पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची वेगाने चौकशी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जलदगती न्यायालय (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करण्याची व तिच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याची घोषणा केली. बलात्कार व हत्या प्रकरण हे फारच भयंकर असून, मला तीव्र वेदना झाल्याचे राव यांनी म्हटले. त्या घटनेनंतर राव प्रथमच जाहीरपणे बोलले असून, अधिकाऱ्यांना त्यांनी जलदगती न्यायालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, तेलंगणातल्या पशुवैद्यक तरुणीवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे वकीलपत्र घ्यायचे नाही असा निर्णय रंगारेड्डी जिल्हा बार असोसिएशनने घेतला आहे. तिच्यावर बलात्कार करणाºया नराधमांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या बार असोसिएशनचे अध्यक्ष मत्तपल्ली श्रीनिवास यांनी सांगितले की, तिच्यावर झालेला बलात्कार व तिच्या मृतदेहाची लावलेली विल्हेवाट या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असल्याने सामाजिक व नैतिक जबाबदारीचे भान राखून या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घ्यायचे नाही असे आमच्या संघटनेच्या वकील सदस्यांनी ठरविले आहे. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला वकील उपलब्ध करून देण्याचा आदेश न्यायालयाने जिल्ह्यातील कायदेविषयक सेवा अधिकाऱ्यांना दिल्यास, त्यावेळी मात्र आम्हाला नकार देता येणार नाही. या आरोपींच्या निषेधार्थ रंगारेड्डी येथील वकील जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर 2 डिसेंबर रोजी निदर्शने करणार आहेत.
पशुवैद्यक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. तिचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी आले असताना, काही कायदेशीर सबबी सांगून पोलिसांनी वेळ काढला. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले. हैदराबादेत पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ नवी दिल्लीत रविवारी कार्यकर्त्यांनी मेणबत्या पेटवून निषेध केला त्यात युवतीही होत्या.
Telangana: Residents of Moosarambagh area of Hyderabad took out a protest march earlier tonight, against the rape and murder of a woman veterinary doctor in Ranga Reddy district on November 28. pic.twitter.com/sHexpAqiTx
— ANI (@ANI) December 1, 2019
पीडिता शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशू चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेला काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितेनं फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री 9.15 वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.
दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची 6 वाजता दूधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी आले असतं त्यांना पीडितेचा स्कार्फ आणि चप्पल दिसली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.