मधल्या सुट्टीत डब्बा खाताना सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 01:25 PM2024-11-26T13:25:27+5:302024-11-26T13:28:11+5:30
हैदराबादमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Shocking News : तेलंगणा हैदराबादमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. शाळेत मधल्या सुट्टीतदरम्यान डब्यातील पुरी खाल्ल्याने एका ११ वर्षीय मुलाचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. शाळेतली जेवणाची सुट्टी विद्यार्थ्याच्या कुटुंबासाठी शोकांतिकेत बदलली. जेवणाच्या डब्यातून पुरी खाल्ल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. शिक्षकानी त्या विद्यार्थ्याल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
हैदराबादमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना पालकांनाही आपल्या मुलांना जेवताना नेमकं काय करायलं हवं हे शिकवण्यास भाग पाडत आह. शाळेत दुपारच्या जेवणादरम्यान पुरी खाल्ल्यानंतर एक विद्यार्थी अचानक बेशुद्ध झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं विद्यार्थ्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत जेवण करताना घशात पुरी अडकल्याने या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हैदराबादमधील बेगमपेट पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. मृताचे वडील गौतम जैन यांच्या तक्रारीवरून बेगमपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जुना बोयगुडा सिकंदराबाद येथील गौतम जैन यांचा मुलगा वीरेन जैन हा परेड ग्राऊंडजवळील शाळेत सहावीत शिकत होता. सोमवारी दुपारी १२.२० वाजता जेवण करत असताना त्याने जेवणाच्या डब्यात ठेवलेल्या तीन पुऱ्या एकाच वेळी तोंडात टाकून खाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुरी घशात अडकली. दम लागल्याने वीरेन जैन खाली पडला. तो बेशुद्ध पडल्याने शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. त्याला तात्काळ मर्दुपल्ली येथील गीता नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. परंतु मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयाने त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सिकंदराबाद येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्याचा आधीच मृत्यू झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. नंतर घशात अडकलेल्या पुऱ्या बाहेर काढण्यात आल्या.
मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना शाळेतून फोन आला होता, ज्यामध्ये त्यांच्या मुलाला तीन पुरी खाल्ल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार करूनही मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत. रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, ही घटना मुलाच्या कुटुंबावर तर मोठा आघात आहेच, पण त्यामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.