Telangana: मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला पोलिसांनी कारसह उचलून नेले, तेलंगणात नेमकं काय सुरू आहे..?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:53 PM2022-11-29T16:53:30+5:302022-11-29T16:54:33+5:30
Telangana: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांना पोलिसांनी कारसह उचलून नेले.
Telangana: इकडे गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, तिकडे तेलंगाणात आगामी विधानसभा निवडणुकांचे (Telangana Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांची बहीण वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (CM KCR) यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. यातच सोमवारी एक विचित्र घटना पाहायला मिळाली.
कारसह वायएस शर्मिला यांना उचलले
#WATCH | Hyderabad: Police drags away the car of YSRTP Chief Sharmila Reddy with the help of a crane, even as she sits inside it for protesting against the Telangana CM KCR pic.twitter.com/ojWVPmUciW
— ANI (@ANI) November 29, 2022
शर्मिला यांच्या वायएसआर तेलंगाना (YSR Telangana) पार्टीने केसीआर सरकारविरोधात(KCR Government) पदयात्रा सुरू केली आहे. यादरम्यान वारंगलमध्ये तेलंगाना राष्ट्र समितीच्या (TRS) कार्यकर्त्यांसोबत झालेल्या वादानंतर सोमवारी शर्मिला यांना ताब्यात घेण्यात आले. या वेळेसचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात शर्मिला कारमध्ये बसलेल्या दिसत आहेत आणि पोलीस क्रेनद्वारे त्यांची कार उचलून घेऊन जात आहेत.
शर्मिलाला पोलीस ठाण्यात घेऊन गेले
तेलंगणात वायएस शर्मिला सतत वादात अडकताना दिसत आहेत. आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शर्मिला रेड्डी मुख्यमंत्री केसीआर यांच्याविरोधात सातत्याने निदर्शने करत आहेत. पदयात्रेतून त्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहेत, मात्र त्यांना मध्येच थांबवण्यात आले आणि सोमाजीगुडा येथून ताब्यात घेण्यात आले.