बापरे! महिलेच्या पोटातून काढली 8 किलोची गाठ, डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 05:28 PM2023-03-07T17:28:42+5:302023-03-07T17:31:02+5:30
Doctors Remove 8-kg Tumour From Woman's Stomach : शशिरेखा असे या शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव असून त्या वर्षभरापासून पोटदुखीने त्रस्त होत्या.
हैदराबाद : तेलंगणातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्मीळ शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून 8 किलोची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. शशिरेखा असे या शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव असून त्या वर्षभरापासून पोटदुखीने त्रस्त होत्या. श्री स्वाती हॉस्पिटलच्याडॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून शशिरेखा यांचे प्राण वाचवले. पोन्नेबोयना श्रीनिवास आणि त्यांची पत्नी शशिरेखा हे तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
शशिरेखा यांना अनेक दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता, त्यांनी जवळच्या काही हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेतले, पण त्यांना पोट दुखण्यापासून आराम मिळाला नाही. यानंतर वैतागलेले हे जोडपे सूर्यापेठ येथील श्री स्वाती या खाजगी हॉस्पिटल उपचारासाठी आले. याठिकाणी शशिरेखा यांचे स्कॅनिंग केले. यावेळी त्यांच्या पोटात गाठ (ट्यूमर) असल्याचे निदान झाले. यानंतर ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जवळपास तासभर चाललेल्या शशिरेखा यांच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांना खूप संघर्ष करावा लागला. अखेर त्यांच्या पोटातून 7-8 किलो वजनाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले. या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला पोटदुखीपासून खूप आराम मिळत आहे, असे शशिरेखा यांनी सांगितले. तसेच, शस्त्रक्रियेबद्दल शशिरेखा आणि तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. यासोबतच त्यांनी पॅरामेडिकल स्टाफ आणि या खासगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचेही आभार मानले आहेत.
याचबरोबर, ही एक अत्यंत दुर्मीळ शस्त्रक्रिया होती, जी इतर कोणत्याही ठिकाणी करणे शक्य नाही, असे डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सांगितले. दरम्यान, आपली वैद्यकीय व्यवस्था एवढी प्रगत झाली आहे की, येथे नेहमीच कोणत्या ना कोणत्या शस्त्रक्रिया किंवा उपचार केले जातात. उदाहरणार्थ, गेल्या महिन्यात चेन्नईतील डॉक्टरांनी एका मधुमेही महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पित्ताशयातील 1,200 खडे काढले होते.