अमेरिकेचे अध्यक्ष देवघरात, तेलंगणच्या शेतकऱ्याने पुजली डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 05:42 PM2018-06-30T17:42:54+5:302018-06-30T17:46:53+5:30
शेतकरी दररोज ट्रम्प यांची साग्रसंगीत पूजा करतो
हैदराबाद- देशातील विविध नेत्यांचे पुतळे किंवा क्वचित ठिकाणी मंदिरं उभी राहिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. तसेच सिने अभिनेत्यांनाही अगदी देवासारखं पुजल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण तेलंगणच्या एका शेतकऱ्याने चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच देवघरात ठेवून पुजायला सुरुवात केली आहे.
बुसा कृष्ण असे या शेतकऱ्याचे नाव असून तो तेलंगणच्या जानगांव जिल्ह्यातील कोण्णे या खेडेगावात राहातो. बुसा कृष्ण याने हिंदू देव-देवतांबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचीही प्रतिमा देवघरात ठेवली आहे. या प्रतिमेची दररोज हळदकुंकू, फुले वाहून पुजा केली जाते आणि ट्रम्पदेवाची आरती त्यांच्या घरी केली जाते.
आंध्र प्रदेशातील श्रीनिवास कुचिभोटला यांची गेल्या वर्षी अमेरिकन नौदलातील एका निवृत्त कर्मचाऱ्याने हत्या केल्यानंतर ट्रम्प यांची पूजा करण्याचा विचार कृष्णाच्या मनात आला. अशी पूजा केल्यामुळेच ट्रम्प यांना भारतीयांचा मोठेपणा दिसून येईल असे त्यांचे मत आहे. त्यांच्याप्रती असणारे प्रेम आणि आपुलकी दिसून येण्यासाठी मी दररोज त्यांची पूजा व आरती करण्याचा निर्णय घेतलाय एकेदिवशी त्यांच्यापर्यंत माझी प्रार्थना पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या आध्यात्मिक ताकदीने भारतीय कोणावरही विजय मिळवू शकतात. एखाद्या शक्तीशाली माणसाचा तुम्ही थेट सामना करु शकत नाही. तुम्ही त्यांना प्रेम आणि उपासनेनेच जिंकू शकता, मी तेच करत आहे अशा शब्दांमध्ये कृष्णाने ट्रम्पउपासनेमागची कारणे सांगितली. असं सगळं असलं तरी कृष्णा यांना ट्रम्प यांच्याबद्दल फारसं माहिती नाही, ते एक शक्तीशाली नेते असून त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये सहभाग घेतला म्हणजे ते शक्तीशाली असणारंच असं मत कृष्णा यांनी व्यक्त केले आहे. (कृष्णा ट्रम्प यांना कुस्तीपटू समजत आहेत).
दक्षिण भारतामध्ये एम. जी. रामचंद्रन तसेच जे. जयललिता यांची तामिळनाडूमध्ये अनेक मंदिरे असून त्यांना पुजले जाते. राजकोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर होते. मात्र त्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केल्यावर ते बंद करण्यात आले.