जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला मिळाले 1 कोटी; मुलाने ऑनलाइन गेममध्ये उडवले 95 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 04:54 PM2022-12-22T16:54:18+5:302022-12-22T16:56:28+5:30
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात राहणाऱ्या शेतकऱ्याला जबर धक्का बसला आहे.
रंडारेड्डी: तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने ऑनलाइन गेममध्ये तब्बल 95 लाख रुपये उडवले आहेत. सरकारने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून हे पैसे शेतकऱ्याला देण्यात आले होते. या घटनेनंतर श्रीनिवास रेड्डी यांना जबर धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहाबाद मंडलातील सीतारामपूर येथील श्रीनिवास रेड्डी यांच्या मालकीची 10 एकर जमीन नुकतीच तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ (TSIIC) साठी सरकारने संपादित केली होती. त्यांना प्रति एकर 10.5 लाख रुपये दराने 1.05 कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती.
इतर ठिकाणी जमीन घेतली होती
या पैशातून त्यांना हैदराबादच्या हद्दीतील शमशाबाद मंडलातील मल्लापूर येथे अर्धा एकर जमीन खरेदी करायची होती. त्यांनी 70 लाख रुपयांचा करार केला होता आणि 20 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले होते. पण, श्रीनिवास यांच्या मुलाने "किंग 567" या ऑनलाइन कॅसिनोमध्ये पैशांचा जुगार खेळला आणि ही रक्कम उडवली. शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करुन घेतली होती.
सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल
श्रीनिवास रेड्डी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सायबर क्राइम पोलिसांसमोर नोंद केली आहे. सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रीनिवास रेड्डी यांचा धाकटा मुलगा हर्षवर्धन रेड्डी हैदराबादच्या निजाम कॉलेजमध्ये प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. सायबर क्राइम विभाग करत आहे.