तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन; वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 06:02 PM2023-08-06T18:02:24+5:302023-08-06T18:02:35+5:30
Gaddar Death : तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन झाले आहे.
हैदराबाद : क्रांतिकारी गीतकार म्हणून प्रख्यात असलेले 'गदर' आपल्यात राहिले नसून त्यांचे वयाच्या ७७ वर्षी निधन झाले आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असे होते. पण, गदर म्हणून त्यांनी सर्वदूर आपली ओळख निर्माण केली. त्यांच्यावर हैदराबादमधील एका रूग्णालयात उपचार सुरू होते, जिथे त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, १९८० च्या कालखंडात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सदस्य झालेले गदर हे संघटनेची शाखा असलेल्या जननाट्य मंडळी या संस्थेचे संस्थापक होते.
तेलंगणा राज्याच्या चळवळीत गदर यांनी वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मुद्द्यास पाठिंबा दिला आणि १०१७ पासून माओवाद्यांसोबतचे संबंध तोडले. खरं तर २०१० पासून माओवादी म्हणून ते सक्रिय नव्हते. लक्षणीय बाब म्हणजे २०१८ च्या निवडणुकीत गदर यांनी प्रथमच मतदान केले. मतदान करणे हे निरर्थक कृत्य असे मानणाऱ्या गदर यांनी प्रथमच तेव्हा मतदानाचा हक्क बजावला.
मागील महिन्यात त्यांनी एक राजकीय पक्ष सुरू करणार असल्याचे जाहीर केले, त्याला त्यांनी गदर प्रजा पार्टी असे संबोधले. तसेच आगामी निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. त्यांनी यापूर्वी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. १९९७ मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली होती आणि ते या हल्ल्यातून सुदैवाने वाचले होते.