कोट्यवधींची आरास! नोटांची फुलं अन् नोटांचाच हार; 4,44,44,444 रुपयांच्या नोटांनी सजलं मातेचं मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 11:17 AM2021-10-12T11:17:28+5:302021-10-12T11:18:50+5:30
Telangana godess temple decorated with notes : यंदा मंदिर सजवण्यासाठी तब्बल 4,44,44,444 रुपयांच्या (4 कोटी 44 लाख 44 हजार 444 रुपये ) खऱ्याखुऱ्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये नवरात्रौत्सव आणि दूर्गा पूजेसाठी देवीचं मंदिर हे आकर्षक आणि भव्य-दिव्य पद्धतीने सजवलं जातं. अनेक भक्त हे सोन्या-चांदीच्या वस्तू देवीला अर्पण करतात. तेलंगणाच्या महबूबनगर जिल्हा केंद्र स्थित कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिरही याचसाठी चर्चेत आहे. मंदिरात कोट्यवधींची आरास करण्यात आली आहे. यंदा मंदिर सजवण्यासाठी तब्बल 4,44,44,444 रुपयांच्या (4 कोटी 44 लाख 44 हजार 444 रुपये ) खऱ्याखुऱ्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दूर्गामातेला महालक्ष्मीच्या रुपात सजवण्यात आलं आहे. कन्यका परमेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल होणारे भक्त अनेक प्रकारे दान - देणग्या देत असतात. यामध्ये नोटांसहीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा आणि वस्तूंचाही समावेश असतो. भाविकांकडून देणगी स्वरुपात मिळालेल्या नोटांचाच वापर यंदा मंदिराच्या सजावटीसाठी करण्यात आला आहे. मंदिरातील मूर्ती आणि भिंतींना नोटा चिटकवून हे मंदिर सजवण्यात आलं आहे.
कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिर चलनातील नोटांनी सजवण्यात आलं
आंध्र प्रदेशमधील नेल्लूर जिल्ह्यातही कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिर चलनातील नोटांनी सजवण्यात आलं आहे. तसेच सजावटीसाठी सोन्या-चांदीचाही वापर करण्यात आला आहे. नवरात्री आणि दूर्गा पूजेच्या निमित्ताने नेल्लूर शहराच्या स्टोन हाऊस पेटा भागात स्थित हे कन्यका परमेश्वरी देवीचं मंदिर माता धनलक्ष्मीच्या रुपात सजवण्यात आलं आहे. यासाठी मंदिरात भाविकांनी दान केलेल्या 5.16 कोटी रुपयांच्या चलनी नोटांचा वापर करण्यात आला आहे.
नोटांची फुलं अन् नोटांचाच हार
2000 रुपये, 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे. दरवर्षी कन्यका मातेच्या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. भाविकांकडून लाखो रुपयांच्या देणग्या मंदिरांना प्राप्त होतात. या पैशांचा वापर मंदिर सजवण्यासाठी केला जातो. नोटांपासून सुंदर सुंदर फुलं आणि हार तयार करण्यात आले आहे. भाविक देवीचं दर्शन आणि सजावटीची भव्यता पाहून आनंदित होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबातचे वृत्त दिले आहे.