फ्लाईटमध्ये राज्यपाल बनल्या देवदूत; वरिष्ठ IPS अधिकाऱ्याचे वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:12 AM2022-07-25T10:12:04+5:302022-07-25T10:13:00+5:30
विमानात प्रवासादरम्यान अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्ज्याच्या आयपीएस अधिकाऱ्याची तब्येत खराब झाली होती.
दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची प्रकृती अचानक बिघडली. तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन याही त्याच विमानात प्रवास करत होत्या. त्यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य बजावताना अधिकाऱ्याचे प्राण वाचवले. कृपानंद त्रिपाठी उजेला हे १९९४ च्या बॅचचे अधिकारी असून ते डेंग्यूनं ग्रस्त झाल्यानंतर आता हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
“गव्हर्नर मॅडमनं माझे प्राण वाचवले. त्यांनी आईप्रमाणे माझी मदत केली. अन्यथा मी रुग्णालयात पोहोचू शकलो नसतो,” अशी प्रतिक्रिया उजेला यांनी शनिवारी पीटीआयशी बोलताना दिली. आंध्र प्रदेश कॅडरचे अधिकारी उजेला यांची सध्या अतिरिक्त डीजीपी (रस्ते सुरक्षा) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Today I have onboarded with @DrTamilisaiGuv and she treated a patient who fell ill on Air on Delhi-Hyd bound flight. @IndiGo6E@TelanganaCMO@bandisanjay_bjp@BJP4India@TV9Telugu@V6Newspic.twitter.com/WY6Q31Eptn
— Ravi Chander Naik Mudavath 🇮🇳 (@iammrcn) July 22, 2022
शुक्रवारी मध्यरात्री उड्डाणादरम्यान उजेला यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर राज्यपालांनी डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं. जेव्हा त्यांनी तपासलं तेव्हा माझ्या हृदयाची गती केवळ ३९ होती. त्यांनी मला पुढे झुकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझा श्वासोच्छवास स्थिर झाला, असंही उजेला यांनी बोलताना सांगितलं. हैदराबादमध्ये उतरल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात नेण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यांच्या प्लेटलेट्सही कमी होऊन १४ हजारांवर आल्या होत्या. जर गव्हर्नर त्या विमानात नसत्या तर कदाचित माझे प्राण वाचले नसते. त्यांनी मला नवं जीवन दिलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.