‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 09:15 AM2024-05-09T09:15:34+5:302024-05-09T09:17:51+5:30
Telangana Lok Sabha Election 2024; हैदराबादमध्ये भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ओवेसी बंधूंना आव्हान देताना १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे ठरतील, असं विधान केलं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. हैदराबादमध्येभाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेलेल्या नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंना आव्हान देताना १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे ठरतील, असं विधान केलं होतं. या विधानावरून आता मोठ्या वादाला तोंड फुटलं असून, एमआयएमने राणांच्या विधानावरून थेट भाजपााला लक्ष्य केलं आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. अशा विधानांमुळे निवडणुकीदरम्यान, दोन समुदायांमधील तणाव वाढू शकतो, असा दावा वारिस पठाण यांनी केला आहे.
या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना त्यांच्या हैदराबाद या पारंपरिक मतदारसंघामध्ये भाजपाच्या माधवी लता यांनी आव्हान दिले आहे. या माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा ह्या हैदराबादमध्ये गेल्या होत्या. तेथील प्रचारसभेदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवनीत राणा म्हणतात की, एक धाकटा आणि एक मोठा भाऊ आहे. त्यात धाकटा भाऊ म्हणतो की, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवलं तर आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ, या छोट्याला माझं एवढंच सांगणं आहे की, तुला १५ मिनिटं लागतील, पण आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे आहेत. १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, ओवेसी बंधूंना कुठून आले आणि कुठे गेले हे कळणारही नाही, असे सांगताना दिसत आहेत.
आता नवनीत राणा यांच्या या विधानावर वारिस पठाण यांनी पटलवार केला आहे. ते म्हणाले की, भाजपा नेते निवडणुकीदरम्यान अशी विधानं करत आहेत जी निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करणारी आहेत. अशी विधानं दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने नवनीत राणा यांच्यावर या विधानासाठी कठोर कारवाई केली पाहिजे. जर वारिस पठाण याने नवनीत राणांसारखं विधान केलं असतं, तर त्याला आज तुरुंगात टाकलं असतं, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या विधानाबाबत वारिस पठाण म्हणाले की, तेव्हा अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वत: आत्मसमर्पण केलं होतं. तसेच जवळपास ४०-४२ दिवस तुरुंगात राहिले होते. नंतर त्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि दोषमुक्त झाले. आता निवडणूक आयोग नवनीत राणा यांच्यावर कधी कारवाई करणार आणि त्यांना तुरुंगात कधी पाठवणार, असा सवाल वारिस पठाण यांनी केला आहे.