(मत)पत्रास कारण की... देशातील एका मतदारसंघात बॅलेट पेपरवर होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:41 PM2019-03-29T13:41:33+5:302019-03-29T14:36:54+5:30
देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे.
नवी दिल्ली - देशात एक असा मतदारसंघ आहे जिथे ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान होणार नाही, तर बॅलेट पेपर अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान होणार आहे. तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघात ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटद्वारे मतदान घेतल्यास प्रत्येक बुथवर तीन-तीन मशीन्स ठेवाव्या लागतील. त्यामुळे अडचणी निर्माण होतील म्हणूनच निवडणूक आयोगाने या मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मतपत्रिकेच्या एकाच कागदावर सर्व उमेदवारींची नावं आणि निवडणूक चिन्ह छापणं सोपं आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने अशाप्रकारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये या गोष्टी शक्य नाही. त्यासाठी तीन-तीन ईव्हीएम मशीन ठेवाव्या लागतील. त्यामुळे पसंतीच्या उमेदवाराला मतदान करताना मतदारांचा गोंधळ उडू शकतो, असं आयोगाने म्हटलं आहे. तसेच संबंधित मतदारसंघात मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी तयारी करण्याच्या सूचनाही आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. निजामाबाद लोकसभा मतदारसंघात येत्या 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले होते. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.