तेलंगणात आता प्रचारफैरींचा झंझावात; भर स्टार प्रचारकांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:44 AM2018-11-20T04:44:54+5:302018-11-20T04:46:01+5:30
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी होऊन २२ नोव्हेंबरला माघार घेता येईल
- धनाजी कांबळे
हैैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी होऊन २२ नोव्हेंबरला माघार घेता येईल. राज्यात सर्वात शेवटी म्हणजे ७ डिसेंबरला मतदान होणार असले तरी वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. राज्यात टीआरएस, भाजपा आणि काँग्रेस-तेलगू देसम-सीपीआय-तेलंगणा जन समिती आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे.आरोप-प्रत्यारोपांचा प्रचारफैरी झडू लागल्याने सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाक्षाध्यक्ष अमित शहा यांचे प्रचारदौरे होणार आहे. याशिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री व टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हेही प्रचारसभा गाजवतील.
स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळालेल्या तेलंगणात प्रथमच सोनिया गांधी सभा घेणार आहेत. त्या २३ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये जाहीर सभा घेतील, तर २८, २९, ३० नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या राज्यात प्रचारसभा होतील. तसेच भाजपाध्यक्ष अमित शहा २५ नोव्हेंबरपासून तीन दिवस प्रचारसभा घेणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र के. टी. रामाराव, पुतणे टी. हरीश राव यांनी याधीच प्रचार सुरू केला असला तरी, त्यांच्याही प्रचारांचा झंझावात यापुढे पाहायला मिळणार आहे. तेलगु देसम पक्षाचे नेते आणि एन. टी. रामाराव यांचे पुत्र एन. बालकृष्ण हे प्रचारदौऱ्यात मुख्य आकर्षण राहणार आहेत. काँग्रेस आघाडीत सहभागी असलेले तेलंगणा जन समितीचे नेते एम. कोडनदरम यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे. शेतकरी प्रश्न, शिक्षण, रोजगार, आरक्षण
यासह विविध मुद्द्यांवर विरोधक टीआरएसवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत तीन महत्त्वाच्या नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डी, एमआयएमचे नेते अकबरूद्दिन ओवेसी आणि भाजपचे नेते जी. किशन रेड्डी यांचा समावेश आहे. नलगोंडी येथील हुजूरनगर मतदारसंघातून उत्तमकुमार रेड्डी यांनी अर्ज दाखल केला आहे.
टीआरएस सरकार अपयशी ठरले असून, काँग्रेस, टीडीपी, सीपीआय आघाडीला तेलंगणातील जनता साथ देईल, असे त्यांनी म्हटले आहे. अकबरूद्दिन ओवेसी हे असुदुद्दीन ओवेसी यांचे बंधू असून, त्यांनी हैैदराबाद विभागात चंद्रयंगुट्टा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे, तर भाजपाच्या किसन रेड्डी यांनी अंबरपेठ येथून अर्ज भरला आहे.
भाजपावर तेलगू देसमचे टीकास्त्र
भारतीय जनता पार्टीचे नेते देशातील लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत. भाजपाने गेल्या चार-साडेचार वर्षांत विरोधी पक्षांचे अस्तित्वच पुसून टाकण्याचाच प्रयत्न केला, अशी टीका आंध्र प्रदेश राज्याचे अर्थमंत्री आणि तेलगू देसमचे नेते रामकृष्णाडू यांनी केली आहे. भाजपाचा कारभार तुघलकी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शहरांची नावे बदलून क्रांती होणार नसून, सर्वसामान्य माणसांचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी टीडीपीला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.