चार्जिंगला लावलेल्या EV बॅटरीचा स्फोट; एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीररित्या जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:27 AM2022-04-21T11:27:39+5:302022-04-21T11:32:12+5:30

EV Battery Explosion : याप्रकरणी पोलिसांनी बॅटरी निर्माता कंपनी Pure EV विरोधात आयपीसी कलम 304-ए (त्वरीत किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू होऊ शकतो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

telangana old man killed wife and grandson receives burn injuries due to explosion in ev battery while charging | चार्जिंगला लावलेल्या EV बॅटरीचा स्फोट; एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीररित्या जखमी

फाईल फोटो

Next

हैदराबाद : तेलंगणातील निजामाबाद शहरात 19 एप्रिलला एक धक्कादायक घटना घडली. निजामाबादमधील सुभाषनगर येथील एका घरात रात्री चार्जिंगला लावलेल्या ईव्ही बॅटरीचा स्फोट होऊन एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी आणि नातू गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बॅटरी निर्माता कंपनी Pure EV विरोधात आयपीसी कलम 304-ए (त्वरीत किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू होऊ शकतो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बी.व्ही. रामास्वामी असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामास्वामी यांचा मुलगा बी प्रकाश, जो व्यवसायाने शिंपी आहे. तो इलेक्ट्रिक दुचाकीचा मालक आहे, ज्याच्या बॅटरीचा स्फोट झाला. बी. प्रकाश यांनी पोलिसांना सांगितले की, मंगळवारी रात्री त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी काढून घरातील दिवाणखान्यात चार्जिंगला ठेवली होती. प्रकाश आणि त्यांची पत्नी कृष्णवेणी बेडरूममध्ये झोपले होते, तर त्यांचे आई-वडील रामास्वामी आणि कमलम्मा त्यांचा नातू कल्याणसोबत दिवाणखान्यात झोपले होते, जिथे बॅटरी चार्ज होत होती. सकाळी 12.30 वाजता प्रकाश यांनी बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली आणि पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास तिचा स्फोट झाला आणि खोलीला आग लागली. या घटनेत रामास्वामी, कमलम्मा आणि कल्याण भाजले.

निजामाबाद III टाऊन पोलिस स्टेशनचे एसआय साई नाथ यांनी सांगितले की, प्रकाश आणि कृष्णवेणी यांनाही आग विझवण्याच्या प्रयत्नात किरकोळ दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे रामास्वामी यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यानंतर पुढील उपचारासाठी हैदराबादला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ईव्ही बॅटरी निर्माता कंपनीद्वारे योग्य मानकांचे पालन केले नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप प्रकाश यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. 

बी. प्रकाश यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीच्या पत्रात म्हटले आहे की, "इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीची निर्मिती करताना मानकांचे पालन केले गेले नाही आणि यामुळे आमच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. कृपया योग्य ती कायदेशीर कारवाई करा." यापूर्वी 26 मार्च रोजी तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाला होता. या घटनेत एक व्यक्तीचा आणि त्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता.

Web Title: telangana old man killed wife and grandson receives burn injuries due to explosion in ev battery while charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.