तेलंगणा पोलिसांची बोगस ‘इसिस’ वेबसाईट
By admin | Published: May 2, 2017 12:48 AM2017-05-02T00:48:47+5:302017-05-02T00:50:49+5:30
मुस्लीम युवकांना जहाल बनवत इसिसकडे आकृष्ट करण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी बोगस वेबसाईट बनविल्याचा खळबळजनक
हैदराबाद : मुस्लीम युवकांना जहाल बनवत इसिसकडे आकृष्ट करण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी बोगस वेबसाईट बनविल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी केल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या दिग्विजयसिंग यांनी बेजबाबदार विधान केले असून त्यांनी ते मागे घ्यावे, अशी मागणी सत्ताधारी टीआरएसने केली आहे. मुस्लीम युवकांना कट्टरवादी बनविण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी इसिसच्या नावे बोगस वेबसाईट बनविली असल्याचे दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटर पेजवर म्हटले.
चिथावणीजनक मजकूर अपलोड करीत मुस्लीम युवकांना इसिसचा घटक बनविण्यासाठी तेलंगणा पोलिसांना पकडले जावे काय? ही नैतिकता ठरते काय? तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांनी पोलिसांना ते अधिकार बहाल केले काय? असे घृणित कृत्य करणाऱ्यांना शिक्षा ठोठावली जावी, असे ते टिष्ट्वटरच्या मालिकेत म्हणाले.(वृत्तसंस्था)
विधान मागे घ्यावे, अन्यथा पुरावे द्यावे...
दिग्विजयसिंग यांनी बेजबाबदार विधान मागे घ्यावे, अन्यथा त्याची पुष्टी करणारे पुरावे सादर करावे, या शब्दांत तेलंगणाचे उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी आव्हान दिले आहे. दिग्विजयसिंग यांनी अतिशय बेजबाबदार विधान केले असून त्यांनी ते विनाअट मागे घ्यावे अथवा पुरावे सादर करावे, असे मुख्यमंत्री के. सी. राव यांचे पुत्र रामा राव यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.