माजी मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या फार्महाऊसवर रेव्ह पार्टी; छाप्यात १४ महिलांसह ३० जणांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 04:28 PM2024-10-27T16:28:22+5:302024-10-27T16:32:00+5:30
तेलंगणा पोलिसांनी राजधानी हैदराबादमधील फार्महाऊसवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला.
Cyberabad Rave Party :तेलंगणातील सायबराबादमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला आहे. सायबराबाद एसओटी पोलिसांनी जनवाडा येथील फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या व्हीआयपी रेव्ह पार्टीवर छापा टाकून अनेकांना ताब्यात घेतले. या छाप्यात फार्महाऊसवर रेव्ह पार्टी करणाऱ्या ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पार्टीमध्ये महिलांचाही समावेश होता. रेव्ह पार्टीचे आयोजकाचे एका बड्या नेत्यासोबतचे संबंध देखील समोर आले आहेत. त्यामुळे तेलंगणातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
तेलंगणाचे माजी मंत्री केटी रामाराव यांचे नातेवाईक राज पकाला यांच्या जनवाडा फार्महाऊसवर टाकलेल्या हाय-प्रोफाइल छाप्यात अवैध दारू आणि ड्रग्जची पार्टी सुरु असल्याचे उघड झालं. ही कारवाई नरसिंगी पोलिस, स्पेशल ऑपरेशन टीम आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली. मकिला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या फार्महाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर छापा टाकण्यात आला होता. या हायप्रोफाईल रेव्ह पार्टीमुळे तेलंगणातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.
रात्री उशिरा टाकलेल्या या छाप्यात अधिकाऱ्यांनी पार्टीत असलेल्या ३५ जणांना ताब्यात घेतले, त्यात २१ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश होता. तपासादरम्यान १०.५ लिटर विदेशी दारूच्या सात बाटल्या आणि परवाना नसलेल्या भारतीय दारूच्या दहा बाटल्याही जप्त करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी पार्टीत असलेल्या लोकांची ड्रग्स चाचणी देखील केली, ज्यामध्ये विजय मदुरी नावाच्या व्यक्तीने कोकेनचे सेवन केल्याचे आढळून आले. मदुरीला पुढील चाचण्यांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे, फार्महाऊस मालक राज पाकला यांच्या विरोधात कलम ३४(अ), ३४(१) आणि उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम ९ अंतर्गत परवान्याशिवाय मद्य बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फार्महाऊसवर अवैध दारू पुरवठा आणि अंमली पदार्थांचा वापर याप्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आलीय.
दरम्यान, पार्टीच्या आयोजकांनी फार्महाऊस वापरण्यासाठी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती. तसेच तिथे मर्यादेपेक्षा जास्त विदेशी मद्य आणले गेले आणि एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन झाले. मात्र केटी रामाराव यांचा मेहुणा पाकलाचे नाव समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून बीआरएसचे राजकीय विरोधक हल्लाबोल करत आहेत.