Telangana Rape Case: ''संसद जसा पाहिजे तसा कायदा बनवण्यासाठी तयार''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 03:53 PM2019-12-02T15:53:39+5:302019-12-02T15:54:25+5:30
तेलंगणा सामूहिक बलात्कार प्रकरणावर राज्यसभेनंतर आता लोकसभेत चर्चा होऊन निषेध नोंदवण्यात आला आहे.
नवी दिल्लीः तेलंगणा सामूहिक बलात्कार प्रकरणावर राज्यसभेनंतर आता लोकसभेत चर्चा होऊन निषेध नोंदवण्यात आला आहे. संसद जसा पाहिजे, तशा कायद्यावर सहमती बनवू शकते, तसेच तो कायदा तयारही केला जाऊ शकतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. जेव्हा गरज असेल तेव्हा या प्रकरणात चर्चा करण्यात येईल. त्यासाठी कायदा बदलण्याची गरज नाही. तर या प्रकरणातील आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, संसदेला आवश्यक वाटल्यास तसा कठोर कायदाही बनवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
लोकसभेत चर्चेदरम्यान अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं की, हैदराबादमधल्या घटनेत पोलिसांत गुन्हा नोंद करताना त्या पीडितेच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही चौकशी समिती नेमायला तीन दिवस लागले. जेव्हा केव्हा अशी घटना घडते, तेव्हा आपण सदनात चर्चा करतो. अशा घटनेचा निषेध नोंदवून कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करतो. परंतु अशा काही घटना रोखण्यासाठी राज्य सरकारला सातत्यानं अपयश येत आहे.
डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे.
राज्यसभेतही या प्रकरणात चर्चा झालेली आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर भाष्य करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात ठार करा असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावं असंही म्हटलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 'अनेक कायदे तयार केले आहेत. मात्र अनेकदा कायदे तयार करून समस्या सोडवल्या जात नाहीत. ही समस्या मूळापासून नष्ट करण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे' असं देखील गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.