तेलंगणात १६ व्या दिवशी सापडला पहिला मृतदेह; दहा फूट गाळाच्या खाली मशिनमध्ये दिसत होता हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:35 IST2025-03-10T14:34:56+5:302025-03-10T14:35:10+5:30

तेलंगणात कोसळलेल्या बोगत्यातून १६ व्या दिवशी पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Telangana tunnel accident One body recovered from the tunnel body found 10 feet below the silt | तेलंगणात १६ व्या दिवशी सापडला पहिला मृतदेह; दहा फूट गाळाच्या खाली मशिनमध्ये दिसत होता हात

तेलंगणात १६ व्या दिवशी सापडला पहिला मृतदेह; दहा फूट गाळाच्या खाली मशिनमध्ये दिसत होता हात

Telangana Tunnel Collapse:तेलंगणामध्ये बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ कामगांपैकी एकाचा मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. तेलंगणा येथे श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याचा एक कोसळला होता. अपघाताच्या वेळी कामगार बोगद्याच्या आत होते. बोगदाच्या काही भाग कोसळत असताना कामगार बाहेर पळत आले. मात्र त्यातले आठ जण आतच अडकले. या आठ कामगारांच्या शोधासाठी दोन आठवड्यांपासून बचावकार्य सुरू आहे. मात्र आता ढिगाऱ्याखाली दबलेल्या आठ जणांचा जीव वाचण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

तेलंगणा बोगदा दुर्घटनेच्या १६व्या दिवशी बचाव पथकाला पहिला मृतदेह सापडला. बोगद्यात शोध घेत असताना गाळाच्या खाली १० फूट खाली मशीनमध्ये गुरप्रीत सिंग नावाच्या कामगाराचा मृतदेह अडकलेला आढळून आला. त्याचा फक्त हात दिसत होता. त्यानंतर मशीनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी नागरकुर्नूल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. इतर ७ मजुरांचा शोध सुरू आहे ज्यासाठी रोबोट आणि स्निफर डॉगची मदत घेतली जात आहे.

गुरप्रीत सिंग याचा मृतदेह कोसळलेल्या एसएलबीसी बोगद्यातून बाहेर काढण्यात आला होता. त्याचा मृतदेह पंजाबमधील मूळ गावी पाठवण्यात आला आहे. उर्वरित सात जणांना शोधण्यासाठी सोमवारीही बचावकार्य सुरूच आहे. रॉबिन्स कंपनीत टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) ऑपरेटर म्हणून काम करणारा गुरप्रीत सिंग हा त्या आठ जणांमध्ये होता. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुरप्रीतच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ४८ तासांहून अधिक काळ खोदकाम करुन गुरप्रीतचा मृतदेह बाहेर काढता आला. १० फूट खोल गाळाखाली तो मशीनसह गाडला गेला होता.

डाव्या कानातले आणि उजव्या हातावरच्या टॅटूवरुन सिंगची ओळख पटली. गुरप्रीत सिंग व्यतिरिक्त, अडकलेल्या इतर सात जणांमध्ये श्री निवास, मनोज कुमार (उत्तर प्रदेश), सनी सिंग (जम्मू आणि काश्मीर), संतोष साहू संदीप साहू, जगता खेस आणि अनुज साहू यांचा समावेश आहे, हे सर्व झारखंडचे आहेत.

दरम्यान, २०२० मध्ये एमबर्ग टेक एजी नावाच्या कंपनीने बोगद्याचे सर्वेक्षण केले होते. बोगद्यातील काही फॉल्ट झोन आणि कमकुवत खडकांच्या धोक्याबद्दल कंपनीने इशारा दिला होता. सर्वेक्षणाचा अहवालही बोगदा बांधणाऱ्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आला होता. १४ किमी लांबीच्या बोगद्यातील १३.८८ किमी ते १३.९१ किमी भागातील खडक कमकुवत असल्याचे अहवालात सांगितले होते. हा भागही पाण्याने भरला आहे. अहवालात ज्या भागाचे धोकादायक वर्णन करण्यात आले होते, तोच भाग पडला असं अधिकाऱ्यांनी म्हटलं. मात्र, राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने त्यांना अशा कोणत्याही अहवालाची माहिती नव्हती असं म्हटलं.

माध्यमांच्या वृत्तानुसार, अपघातानंतर बोगद्यात काम करणाऱ्या काही कामगारांनी भीतीपोटी काम सोडले आहे. या प्रकल्पात ८०० लोक काम करत आहेत. त्यापैकी ३०० स्थानिक तर उर्वरित झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.

Web Title: Telangana tunnel accident One body recovered from the tunnel body found 10 feet below the silt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.