Telangana Video: समजावून थकली, शेवटी डोळ्यात मिरची पावडर घातली; गांजाची नशा करणाऱ्या पोराला आईचा हिसका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 05:14 PM2022-04-05T17:14:32+5:302022-04-05T17:14:37+5:30
Telangana Video: 15 वर्षीय मुलाचे गाजांचे व्यसन सोडवण्यासाठी आईनेच डोळ्यात मिरची पावडर घातल्याची घटना समोर आली आहे.
हैदराबाद: गांजाचे व्यसन लागलेल्या मुलाच्या डोळ्यात सख्या आईनेच मिरची पावडर टाकल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय मुलाला गांजाचे व्यसन लागल्याने संतापलेल्या महिलेने मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याची घटना तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील कोडाड येथे घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली
आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, 15 वर्षीय मुलाचे गांजाचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने त्याला एका खांबाला दोरीने बांधले. यानंतर दुसऱ्या एका महिलेच्या मदतीने त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या डोळ्यात आणि संपूर्ण चेहऱ्यावर मिरची पावडर लावली. यादरम्यान तो तरुण वेदनेने जोरजोरात ओरडत होता. यावेळी काही शेजारी मुलाच्या आईला त्याच्या डोळ्यात पाणी टाकण्यास सांगताना दिसत आहे.
व्हिडिओ पहा:
A mother found out that her 15-yr-old son was becoming ganja addict and came up with unique treatment by tying him to a pole & rubbed Chilli powder in his eyes until he promises to quit#Telangana#Suryapetpic.twitter.com/MWPsznOICK
— sarika (@Sarika__reddy) April 4, 2022
तेलंगणात मिरची पावडर टाकणे सामान्य...
गांजा पिण्याची सवय सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतरच महिलेने आपल्या मुलाला सोडले. दरम्यान, तेलंगणातील ग्रामीण भागातील पालक मुलांच्या डोळ्यात मिरची पावडर चोळणे हे काही नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. पण, मुलांच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी अशाप्रकारची डोळ्यात मिरची पावडर टाकणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. काही नेटिझन्सचे म्हणने आहे की, अशाप्रकारच्या शिक्षेने मुले सुधारण्याऐवजी अजून बिघडू शकतात.
हैदराबादमध्ये ड्रग्सच्या घटनांमध्ये वाढ
हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वीच एका इंजिनीअरचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस आणि नव्याने स्थापन झालेली हैदराबाद नार्कोटिक्स एन्फोर्समेंट विंग (H-NEW) ड्रग्स पेडलर्ससह ड्रग्ज घेणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात अनेक युवक आणि विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी गेले असून ते गुन्हेगारी व इतर समाजविघातक कृत्यांमध्ये गुंतले आहेत. पोलिसांनी युवक व विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांना बळी पडू नये असे आवाहन केले असून पालकांनी आपल्या मुलांच्या कामांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले आहे. .