टेलिकॉम कंपन्यांना दोन वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवावे लागणार कॉल रेकॉर्ड्स; सरकारनं जारी केला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 05:44 PM2022-01-31T17:44:43+5:302022-01-31T17:45:08+5:30
Telecom Companies Call Recording : परिपत्रकानुसार, परवानाधारक कंपन्यांना कॉल डेटा रेकॉर्ड, आयपी रेकॉर्ड आणि सर्व व्यावसायिक रेकॉर्ड किमान दोन वर्षांसाठी संग्रहित करावे लागतील.
सरकारने परदेशातून केलेले नॉर्मल कॉल्ससह (International Calls) इंटरनेट कॉल्स, सॅटेलाइट फोन कॉल्स (Satellite Phone Calls), कॉन्फरन्स कॉल्स (Conference Call) आणि मेसेजेस किमान दोन वर्षांसाठी सुरक्षित ठेवणं बंधनकारक केलं आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार सेवा प्रदात्यांना आंतरराष्ट्रीय कॉल आणि मेसेजेस सुरक्षित ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
डिसेंबरमध्ये युनिफाइड लायसन्समध्ये केलेल्या दुरुस्तीनंतर दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये दोन वर्षांसाठी कॉल डेटा रेकॉर्डशिवाय इंटरनेट तपशील ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी ही तरतूद केवळ एका वर्षासाठी लागू होती. युनिफाइड परवानाधारक कंपन्यांमध्ये भारती एअरटेल (Bharti Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-idea), बीएसएनएल (BSNL) या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या आपल्या ग्राहकांना सॅटेलाइट फोन सेवा वगळता सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदान करतात.
सुरक्षाकारणासाठी निर्णय
विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, परवानाधारक कंपन्यांना कॉल डेटा रेकॉर्ड, आयपी रेकॉर्ड आणि सर्व व्यावसायिक रेकॉर्ड किमान दोन वर्षांसाठी संग्रहित करावे लागतील, जेणेकरून सरकार सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची पडताळणी करू शकेल. जर सरकारकडून विशिष्ट निर्देश दिले नाहीत, तर दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपन्या तो रेकॉर्ड डिलीट करू शकतात. युनिफाइड लायसन्सशी संबंधित तरतुदींमधील बदल टाटा टेलिकम्युनिकेशन्स (Tata Communications), सिस्को वेबेक्स (Cisco Webex), एटी अँड टी (AT&T) अशा ज्यांनी हे परवाने खरेदी केले आहेत,अशा ग्लोबल नेटवर्क्सनदेखील लागू होतील.