मोबाईलचे रिचार्ज 'इतके' महागणार?; कंपन्या नुकसान भरून काढण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:04 PM2020-07-06T14:04:23+5:302020-07-06T14:13:36+5:30
मोबाईल कंपन्या लवकरच दरवाढ करण्याच्या तयारीत
नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी मोबाईल धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सर्व मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांचे रिचार्ज लवकरच महागण्याची शक्यता आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे कंपन्यांपुढील समस्या अचानक वाढल्या. त्यामुळे आता पुढील १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत दोनवेळा मोबाईल प्लान्स महाग होऊ शकतात. या वाढीनंतर रिचार्जचे दर आताच्या तुलनेत दुप्पट होतील. 'नवभारत टाईम्स'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
सध्याच्या घडीला मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या रिचार्जचे दर वाढवण्याच्या विचारात आहेत. याची तातडीनं अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आता लगेच रिचार्जचे दर न वाढल्यास ते पुढील काही दिवसांत वाढवले जातील, अशी माहिती इमर्जिंग मार्केट्स टेक्नॉलॉजी, मीडिया एँड एंटरटेनमेंट एँड टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या प्रशांत सिंघल यांनी दिली. 'रिचार्जचे दर वाढवण्याची गरज आहे. पुढील ६ महिन्यांत दरांमध्ये वाढ आवश्यक आहे. ही दरवाढ जितकी लवकर होईल, तितकं कंपन्यांसाठी चांगलं असेल,' असं सिंघल म्हणाले.
सध्याची परिस्थिती पाहता ग्राहकांना परवडणारे रिचार्ज देणं गरजेचं आहे. ग्राहकांची आर्थिक स्थिती लक्षात घेता मोबाईल प्लानचे दर वाढवणं फारशी चांगली कल्पना वाटत नाही, असं सिंघल यांनी सांगितलं. पुढील १२ ते १८ महिन्यांत दोनवेळा मोबाईल प्लान महाग होऊ शकतात. पुढील सहा महिन्यांत कंपन्या पहिली दरवाढ करतील. बाजारात स्थिर राहण्यासाठी कंपन्यांना हे पाऊल उचलावं लागेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. मात्र अद्याप यावर कंपन्यांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.
गेल्या डिसेंबरमध्ये कंपन्यांनी टॅरिफ प्लान्सचे दर वाढवले होते. भारतीय बाजाराचा आकार पाहता कंपन्यांकडे असणाऱ्या ग्राहकांची संख्या अतिशय मोठी आहे. मात्र प्रति ग्राहकाकडून अपेक्षित असलेला महसूल कमी आहे. त्यामुळे ग्राहक जास्त असूनही अनेक कंपन्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे गेल्या डिसेंबरमध्ये कंपन्यांनी टॅरिफचे दर ४० टक्क्यांनी वाढवले. आता दोन टप्प्यांमध्ये कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य २ किलोमीटर माघारी
चीनला धक्का देण्याची तयारी; पंतप्रधान मोदी 'खास' माणसावर सोपवणार जबाबदारी?