आधार ई-केवायसी वापर बंद करा; सरकारचे टेलिकॉम कंपन्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 09:48 AM2018-10-27T09:48:15+5:302018-10-27T09:48:24+5:30
मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी किंवा नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डची मागणी करणं बंद करण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली - मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी किंवा नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डची मागणी करणं बंद करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सरकारने शुक्रवारी हे निर्देश जारी केले आहेत. सुप्रीम कोर्टानं गेल्या महिन्यात महत्त्वपूर्ण निर्णय देताना, कायदेशीर तरतुदींच्या अभावामुळे खासगी कंपन्यांद्वारे होणारा आधार ईKYCचा वापर करणं बंद करण्यास सांगितले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांसाठी तपशीलवार दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये कंपन्यांना आधारद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ई-केव्हायसीचा वापर करणं थांबवण्यास सांगितले आहे. शिवाय, यासंबंधीचा अहवाल 5 नोव्हेंबरपर्यंत देण्यास सांगितला आहे.
दूरसंचार विभागानं आपल्या 3 पानांच्या परिपत्रकात म्हटले आहे की, ग्राहकांच्या खासगी माहितीच्या पडताळणीसहीत त्यांना नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी आधार ई-केव्हायसीचा उपयोग केला जाऊ शकत नाही. दरम्यान, जर नवीन कनेक्शनसाठी ग्राहक स्व-ईच्छेनं आधार कार्डची प्रत पुरवत असेल तर कागदपत्रांच्या स्वरुपात त्याचा वापर केला जाऊ शकतो. पण याचा ऑफलाइनच वापर केला जाऊ शकतो. शिवाय, सर्व टेलिकॉम कंपन्या वेळबद्ध पद्धतीनं या आदेशाचे पालन सुनिश्चित करतील, असेही यात सांगण्यात आले आहे.
दूरसंचार विभागाच्या अनुसार, मोबाइल ग्राहकांना पर्यायी डिजिटल प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये कस्टमर एक्विझिशन फॉर्मसहीत ग्राहकांना फोटोसोबत ओळख आणि पत्त्यासाठी स्कॅन कॉपीचा उपयोग करता येईल. या पार्श्वभूमीवर नवीन ग्राहकांसाठी सर्व डिजिटल प्रक्रिया असतील.