टेलिफोन बिल, हॉटेलिंग, विमानाचं तिकीट 1 जूनपासून महागणार
By admin | Published: May 31, 2016 05:58 PM2016-05-31T17:58:51+5:302016-05-31T21:40:49+5:30
केंद्र सरकारनं सर्व करपात्र सेवांवर 0.5 टक्के कृषी कल्याण सेस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31- मोबाईलवर जास्त वेळ बोलणं आणि हॉटेलिंग करणं आता महागात पडणार आहे. केंद्र सरकारनं सर्व करपात्र सेवांवर 0.5 टक्के कृषी कल्याण सेस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेस्टॉरंटचं बिल, विमानाचं तिकीट आणि टेलिफोन बिल महागणार आहे. कृषी कल्याण सेस उद्यापासून लागू होत असल्यामुळे सर्व्हिस टॅक्स 15 टक्क्यांवर जाणार आहे. कृषी कल्याण सेस लागू केल्यानंतर या वर्षी ग्राहकांवर 20,600 कोटींचा बोजा पडणार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
1 जूनच्या आधी ज्या ग्राहकांचं बिल जनरेट झालं आहे, त्यांना कृषी कल्याण सेस लागू होणार नाही. मात्र ते बिल 1 जूननंतर भरल्यास त्यांना कृषी कल्याण सेस भरावा लागणार आहे. कृषी कल्याण सेस लागू झाल्यामुळे ग्राहकांना दिल्या जाणा-या सेवांवर आता व्हॅट आणि सेवा शुल्क व्यतिरिक्त शुल्क भरावं लागणार आहे. कृषी कल्याण सेसमुळे सर्व्हिस टॅक्स महागणार असून, मूल्यवर्धित सेवांना हा कर स्वच्छ भारत सेसनुसारच लागू होणार आहे.
केंद्र सरकारनं कृषी, शेतक-यांचं हितासाठी हा कृषी कल्याण सेस लागू करत असल्याचं अरुण जेटलींनी म्हणालेत. मात्र कृषी कल्याण सेसमधून 47 सेवांना वगळण्यात आलं आहे. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डनं रेल्वेचं तिकीट बुक केल्यास कृषी कल्याण सेस भरावा लागणार नाही. त्यामुळे आता रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडकीतून तिकीट बुक केल्यासही अतिरिक्त 30 रुपयांचं शुल्क भरावं लागणार नाही. आयआरसीटीसीवरून ऑनलाइन पद्धतीनं तिकीट बुक केल्यासही कृषी कल्याण सेस लागू होणार नाही. 2 लाखांहून अधिक किमतीचं सोनं खरेदी केल्यास 1 टक्क्याचा टीसीएस भरावा लागणार आहे.