"तेली का बेटा..."! PM मोदींवरील 'ते' वक्तव्य ममतांना महागात पडणार, सुवेंदू अधिकारी यांनी OBC मुद्दा तापवला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:10 AM2024-04-01T10:10:52+5:302024-04-01T10:11:46+5:30
"राज्यातील ओबीसी लिस्टमध्ये असलेल्या एकूण 179 जातींपैकी 118 जाती या मुस्लीम समाजाशी संबंधित..."
लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर, राजकीय पक्षांकडून आपापल्या पक्षांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. जस-जशा मतदानाच्या तारखा जवळ येत आहेत, तस तसा नेत्यांच्या भाषेचा दर्जाही खालावताना दिसत आहे. नुकतेच टीएमसी नेते पियुष पांडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीचा उल्लेख करत भाष्य केले होते. पंतप्रधानांच्या जातीचा उल्लेख करत पांडा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी हा ओबीसी समाजाचा अपमान असल्याचे म्हणत मुद्दा तापवायला सुरुवात केली आहे. ऐन निवडणूक काळात सुरू झालेला हा वाद ममता बॅनर्जींना महागात पडू शकतो. कारण पश्चिम बंगालमध्ये ओबीसी समाजाचा वाटा जवळपास 16 टक्के एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, सुवेंदू यांनी तुष्टीकरणाचा आरोप करत ओबीसी यादीची चर्चाही सुरू केली आहे.
तेली अन् बूट पॉलिश -
यासंदर्भात सुवेंदू अधिकारी यांनी एक्सवर मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, टीएमसी प्रादेशिक युनिटचे अध्यक्ष पीयूष पांडा जर काही बोलले असतील तर, ती त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका मानली जायला हवी. 'पांडा यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'तेल्याचा मुलगा' संबोधून अपमान करण्याचा प्रयत्न केला नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्हे, संपूर्ण ओबीसी समाजाचाच अपमान केला आहे. तसेच, बूट पॉलिश करने हे ओबीसी समाजातील लोकांसाठी चांगले काम आहे,' असेही त्यांनी इशारा करत म्हटले आहे."
सुवेंदूंची ओबीसी मुद्दा तापवायला सुरुवात -
सुवेंदू एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पांडा यांच्या नेत्याने (ममता बॅनर्जी) आधीच मागास प्रर्गासंदर्भातीत मंडल आयोगचे निकष कमकुवत केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये खऱ्या ओबीसी समाजाला वंचित करत, त्यांनी आपल्या पसंतीच्या व्होट बँकेला चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ दिला आहे. खरे तर, राज्यातील ओबीसी लिस्टमध्ये असलेल्या एकूण 179 जातींपैकी 118 जाती या मुस्लीम समाजाशी संबंधित आहेत. गेल्या वर्षातील एका अहवालानुसार, 2011 नंतर राज्यातील ममता सरकारने 65 मुस्लीम आणि 6 हिंदू जातींचा यात समावेश केला आहे.
सुवेंदू पुढे म्हणाले, ममता बॅनर्जींनी ओबीसी समाजाला शिव्या देण्याचा अधिकार आपल्या ज्युनिअर नेत्यांना दिला आहे, असे वाटते. कारण असे नसते, तर अशा खालच्या स्थरावरील नेत्याची पंतप्रधानांसंदर्भात, असे बोलण्याची हिंमत झाली नसती. याशिवाय, सुवेंदू यांनी राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना यासंदर्भात दखल घेण्याची विनंती केली आहे. तसेच, संबंधित नेत्याला निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे.
काय म्हणाले होते पांडा? -
सुवेंदू यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, इंग्रजीमध्ये लिहिण्यात आलेल्या त्याच्या अनुवादानुसार, पांडा म्हणाले, त्यांनी (पीएम मोदी) एका अर्धवट राममंदिराचे उद्घाटन केले. 4 शंकराचार्यांनी म्हटले आहे की, हिंदू धर्मात असे होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी अभिमानी आहेत. ते एका त्याचे पुत्र आहेत. ते राम मंदिराचे उद्घाटन आणि पूजा कशी करू शकतात.'