टोमॅटोने चांगलाच भाव खाल्लाय, सांगा कोण जबाबदार, तुम्ही की आम्ही?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 06:20 AM2023-07-16T06:20:38+5:302023-07-16T06:21:25+5:30
एरवी भाव न मिळाल्याने रस्त्यांवर फेकून दिला जाणारा टोमॅटो सध्या दरवाढीमुळे चर्चेत आहे... पण ही स्थिती का आली?
पवन देशपांडे,
आठवतंय ? दोन-तीन महिन्यांपूर्वी देशभरात ठिकठिकाणी लाल चिखल पाहायला मिळाला होता. टोमॅटोला अगदी एक-दोन रुपये भाव मिळू लागल्याने नाईलाजाने असंख्य शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकवलेला माल डोळ्यांदेखत रस्त्यावर फेकावा लागला होता... आता याच टोमॅटोला पेट्रोलपेक्षाही जास्त भाव आलाय... शेतकऱ्यांसाठी हे सुखावह आहेच... ते असायलाच हवे... त्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळायलाच हवा.. यात कुठलीही शंका नाही. पण, कधी शेतकऱ्यांना रडकुंडीला आणणारे भाव तर कधी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चाट देणारे दर... यात मध्यम मार्ग कधी निघत नाही का ?
परवडेना म्हणून अनेक हॉटेल्सनी टोमॅटोचा वापरच बंद केला. काहींनी तर आपल्याकडील टोमॅटोच्या पदार्थांचे दर दुप्पटही केले. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनेही टोमॅटोच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. म्हणे आता टोमॅटोमुळे महागाई दर वाढू शकतो. (शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असतील, काय हरकत आहे ?)
दोन महिन्यांत असे कोणते चित्र पालटले की, आधी १-२ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत असताना अचानक तो शंभरीच्या पुढे गेला ? टोमॅटोच्या भावात ७०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली ? दोन महिन्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो रस्त्यावर फेकला त्यांच्या मनाची किती घालमेल सुरू असेल आणि आता त्यांच्या शेतात टोमॅटो नाही, म्हणून ते नशिबाला किती दोष देत बसले असतील? आणि निश्चितच आता टोमॅटोला भाव मिळतोय म्हणून ज्यांचा माल विकला जातो, त्यांच्यासाठी सुखावह आहेच. पण, दरातील हा एवढा चढउतार कशामुळे ? हा प्रश्न आहेच.
गेल्या महिन्यात बिपोरजॉय वादळ आले. गुजरातमधून ते पोहोचले थेट राजस्थानात. या अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्तर प्रदेशातही तेच. महाराष्ट्र आणि कर्नाटकात किडीने हैराण केले. त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले. साडेपाच लाख क्विंटल टोमॅटो बाजारात येत होता, तो अर्ध्यावर आलाय.
एकीकडे दोन महिन्यांआधी शेतकऱ्यांना रडू असे भाव तर दुसरीकडे दोन महिन्यांनी ग्राहकांच्या डोळ्यांत अश्रू येतील असे दर. हे टाळायचे कसे, याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नाही. सरकार यावर उपाय शोधू इच्छिते. अशी स्थिती कशी टाळावी, याच्या आयडिया मिळवण्यासाठी सरकारने चक्क स्पर्धाही भरवली आहे. टोमॅटो ग्रॅंड चॅलेंज आपण घेत असल्याचे आणि लोकांनी त्यावर आयडिया शेअर कराव्यात, असे आवाहनच ग्राहक व्यवहार खात्याच्या सचिवांनी केले आहे. यातून समस्या मिटली तर उत्तमच पण, आणखीही प्रश्न आहेत, ते सोडवणेही गरजेचे आहे.
कोल्ड स्टोरेजची संख्या वाढवणे आणि ते शेतकऱ्यांना उपलब्ध असणे ही गरज आहे. शीतगृहांमध्ये बटाट्यांचे प्रमाणच अधिक आहे. टोमॅटो लवकर खराब होतो. त्यामुळे त्याची काळजी अधिक घ्यावी लागते, त्यांची विक्रीही कमी दिवसांत पूर्ण करावी लागते, ही समस्याही दरांच्या वाढत्या आणि घसरत्या किंमतींमध्ये आहे. टोमॅटोचे भरमसाठ उत्पादन झाले तर ते जास्तीत जास्त टिकवून ठेवता येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध झाल्यास, एकाच वेळी भरमसाठ माल बाजारात येणार नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच भाव वाढही भरमसाठ होणार नाही. मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण संतुलित राहील. पण, ही योग्य स्थिती सध्यातरी स्वप्नवत आहे. ती प्रत्यक्षात यावी, हीच इच्छा.
एवढ्यावर भागेल का?
टोमॅटो स्वस्तात विकण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर तो टोमॅटो जिथे मागणी जास्त तिथे कमी दरात विकला जाईल. त्यातून किती स्वस्ताई येईल, टोमॅटो खरेदी करून सरकार किती दिवस ठेवू शकणार, किती काळ विकू शकणार असे प्रश्न आहेतच.
एवढं सगळं घडण्याचं कारण काय ?
एप्रिल-जून महिन्यात जे पीक बाजारात येते त्याची लागवड जानेवारी-मार्चमध्ये केली जाते. यंदा या काळात काही ठिकाणी प्रचंडउष्णता आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस होता. त्यामुळे टोमॅटोवर किडीचा हल्ला झाला. कर्नाटक आणि महाराष्ट्रात कमी उत्पादन झाले. मे महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसानेही टोमॅटो पिकांचे नुकसान केले. त्यामुळे बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात यायला सुरुवात झाली. साहजिकच टोमॅटोचे भाव वाढले.
असे भाव कधीपर्यंत?
गेल्या काही महिन्यांत टोमॅटोचे दर कोसळल्याने अनेक शेतकऱ्यांनी हे पीक पुन्हा घेतलेच नाही. ज्यांनी घेतले त्यांना आता चांगला भाव मिळाला. आता वाढलेले भाव आणखी काही आठवडे राहू शकतात. या भावातील चढउतारावर सरकारने उपाय शोधणे गरजेचे आहे, असे मत टोमॅटो व्यावारी अजित बोरोडे यांनी व्यक्त केले.
(लेखक लोकमत मुंबईत आवृत्तीचे सहायक संपादक आहेत)