दिल्लीचा झाला बर्फ, तापमान १.५ अंशांपर्यंत खाली; दाट धुक्यांनी वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 10:11 AM2023-01-09T10:11:47+5:302023-01-09T10:15:01+5:30
तीव्र थंडीच्या लाटेने दिल्लीसह मैदानी भाग वेढले, जेथे किमान तापमान १.५ अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे.
नवी दिल्ली : रविवारी उत्तर भारत आणि देशाच्या पूर्व भागात धुक्याच्या चादरीमुळे ४८० हून अधिक रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यातील ८८ रद्द कराव्या लागल्या. तीव्र थंडीच्या लाटेने दिल्लीसह मैदानी भाग वेढले, जेथे किमान तापमान १.५ अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे.
दिल्लीचे किमान तापमान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील बहुतांश ठिकाणांपेक्षा सलग चौथ्या दिवशी कमी होते,असे हवामान खात्याने म्हटले आहे. धुक्यामुळे सुमारे ३३५ रेल्वे उशिराने धावल्या, तर ८८ रद्द कराव्या लागल्या. ३१ गाड्या वळवाव्या लागल्या आणि ३३ तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या,असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
विमान सेवेवरही परिणाम
दिल्ली विमानतळ लिमिटेडने ट्विट केले की, धुक्यामुळे विमान वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. रविवारी सकाळी २५ उड्डाणे उशिरा झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवी दिल्लीत दाेन वर्षांतील नीचांक
रविवारी दिल्लीला तीव्र थंडीची लाट आली, शहराचे प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेध शाळेतील किमान तापमान १.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे २ वर्षांतील जानेवारीतील सर्वात कमी आहे. चंबा (८.२ अंश), डलहौसी (८.२), धर्मशाळा (६.२), सिमला (९.५) यासह हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमधील बहुतेक थंड हवेच्या ठिकाणांच्या तुलनेत कमी असल्याचा चौथा दिवस होता.