मंदिर वही बनायेंगे! - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 04:39 AM2018-12-25T04:39:13+5:302018-12-25T04:39:34+5:30
राममंदिराची लढाई ही केवळ सात वर्षांची नाही. सातशे वर्षांपासूनची आहे. यात धु्रवीकरण आणि राजकारण कुणीही घुसवू नये.
राममंदिराची लढाई ही केवळ सात वर्षांची नाही. सातशे वर्षांपासूनची आहे. यात धु्रवीकरण आणि राजकारण कुणीही घुसवू नये. राम मंदिराबाबत जर चर्चा होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. प्रभू श्रीरामाने आम्हाला मर्यादा शिकवली. महात्मा गांधीही रामराज्य यावे असे सांगत होते. आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत त्यामुळे न्यायपालिकेचा सन्मान करू. राममंदिर हा कोट्यवधी जनतेच्या आस्थेचा प्रश्न आहे. या देशातील मानबिंदू आणि संस्कृती मिटविण्यासाठी राममंदिर तोडले गेले. आता प्रश्न हा नाही की, मंदिर केव्हा होईल? मंदिर जागेवर आहेच. भव्य मंदिर केव्हा होईल मुद्दा उरला आहे. मंदिर उभारले जावे यासाठी आमचे प्रयत्न असतीलच मात्र कुणी जर मस्जिद तोडत असेल तर त्याला माझा विरोध असेल. मस्जिदीच्या बाजूने मी उभा राहील अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
मंदिराबाबत संसदेत कायदा व्हावा असे वाटते का? असा प्रश्न विचारता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यसभेत भाजपचे संख्याबळ नाही. राहुल गांधी अलीकडे मंदिरात जात असतात. त्यांनी जर राममंदिरास पाठिंबा दिला तर राज्यसभेत हा कायदा सहज मंजूर होऊ शकतो.
प्रश्न : राज ठाकरेंच्या मते राहुल गांधी हे पप्पूवरून परम पूज्य झालेत?
उत्तर : राज ठाकरे माझे मित्र आहेत. अलीकडे ते केवळ त्यांची मते मांडत असतात. तेवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे. त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही. तुम्हीही घेऊ नका.
प्रश्न : विधानसभांच्या निवडणुकीत ‘पप्पू पास हो गया’ असे वाटत नाही?
उत्तर : राहुलजींना खूप खूप शुभेच्छा. राजस्थान आणि मध्यप्रदेशात आम्हाला जी मते मिळाली त्यावरून भाजपचा हा पराभव आहे असे वाटत नाही. आम्ही आत्मनिरीक्षण करू.|
प्रश्न : शरद पवार म्हणतात, भाजपने सातत्याने एकाच कुटुंबावर हल्ला चढविला, ते लोकांना पसंत पडले नाही. त्याचा फटका बसला. तुम्हाला काय वाटते?
उत्तर : बघा, ही गोष्ट त्यांना (पवारांना) १९९९ मध्ये लक्षात आली असती तर त्यांनी वेगळा पक्ष काढला नसता. आता त्यांचे लक्ष या कुटुंबाकडे गेले. १९९९ मध्ये सोनियाजींवर सर्वात मोठा हल्ला पवारांनीच चढवला होता.
प्रश्न : भारतीय जनता पार्टीमध्ये अहंकार आला म्हणून तीनही राज्यात पराभव झाला असे उद्धव ठाकरेंचे मत आहे, तुम्ही सहमत आहात?
उत्तर : मी असे अजिबात मानत नाही. विजय-पराभव हे चालत राहणार. आम्ही का हरलोत याचा शोध घेऊ. परंतु भाजप लोकांचा पक्ष आहे. आम्ही सगळे जमिनीशी जुळलो आहोत.
प्रश्न : उद्धव ठाकरे म्हणतात, भाजपला केवळ दोनच लोक चालवितात?
उत्तर : देशात ९९ टक्के पक्ष असे आहेत की, परिवार त्या पक्षाचा मालक आहे. त्यामुळे त्यांना तसे वाटते. भाजप अशी पार्टी आहे की सामान्य कार्यकर्ता या पक्षाचा मालक असतो. ही कोणत्याही परिवाराची पार्टी नाही. सामान्य कार्यकर्ता पक्षाचा पदाधिकारी, अध्यक्ष होतो. माझ्यासारखा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो.
प्रश्न: २०१४ मध्ये भाजपने कॉँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. त्याचे काय?
उत्तर : कॉँग्रेसमुक्त भारत म्हणजे या पक्षाला देशाबाहेर काढून फेकणे असे नाही. या देशात कॉँग्रेसची वर्षानुवर्षे असलेली धु्रवीकरणाची, भ्रष्टाचाराची प्रवृत्ती नष्ट करणे असा त्यामागचा संदर्भ होता. या प्रवृत्तीपासून मुक्ती देणे ही आमची घोषणा होती.
प्रश्न : तीन राज्यांमध्ये भाजपमुक्त व्हावे लागले त्याचे?
उत्तर : राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये अजिबात आम्ही भाजपमुक्त झालो नाही. राजस्थानमध्ये मतांचा फरक केवळ ०.५ टक्के आहे. तर मध्य प्रदेशात आम्हाला कॉँग्रेसपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. २०१३ मध्ये राजस्थानात भाजपला १६५ जागा मिळाल्या होत्या तिथे कॉँग्रेसचे सदस्य दिसतही नव्हते. आमचे तिथे ७३ सदस्य निवडून आलेत. कॉँग्रेस मात्र, शंभरीही पार करू शकली नाही. राजस्थानचे चरित्र पाहिले तर प्रत्येक वेळेस सरकार बदललेले दिसते. छत्तीसगडमध्ये मात्र आमचा दारुण पराभव झाला हे आम्ही स्वीकारतो आणि त्याचे आत्मनिरीक्षणही करणार आहोत.
प्रश्न : कॉँग्रेस नव्या जोमात आल्याची चर्चा आहे, तुम्ही याचे चिंतन केले का?
उत्तर : कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळत आहे, हे चांगले आहे. चांगला विरोधी पक्ष असायला पाहिजे. मी आनंदी आहे. राहुलजी कॉँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. त्यांना पुढचे ५-१० वर्ष विरोधी पक्षात राहायचे आहे.
प्रश्न : महाआघाडी झाल्यास भाजपची स्थिती कशी राहील?
उत्तर : २०१४ मध्ये महाआघाडीत असलेले सर्व पक्ष आमच्याच विरोधात लढले. याही वेळेस लढतील. त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. २०१४ सारखीच स्थिती २०१९ मध्ये दिसेल.
प्रश्न : उद्धव ठाकरे म्हणतात, निवडणुका जवळ आल्याने भाजपचे रामनाम जपणे सुरु आहे?
उत्तर : रामाचे नाव घेणे आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. रामाचे मंदिर व्हायलाच पाहिजे, हे या देशातील कोट्यवधी हिंदूंना वाटते. भव्य राममंदिर व्हावे याच मताचे आम्ही आहोत.
प्रश्न : आतापर्यंत मध्यावधी निवडणुकांमध्ये भाजप हरत गेली?
उत्तर : भाजपने ११ राज्य जिंकले. स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आल्यात. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे.
प्रश्न : राहुल गांधी म्हणतात मोदी सरकारने केवळ उद्योगपतींचे कर्ज माफ केले?
उत्तर : राहुल गांधी यांचे स्वत:चे म्हणणे नसते. त्यांना कुणी लिहून दिलेले ते वाचतात. सर्वाधिक कर्ज हे युपीएच्या काळातील आहे.
प्रश्न : तुमच्याच काळात विजय मल्ल्या पळाला?
उत्तर : हो, त्याला आता आणले जात आहे. त्याला पैसा युपीएने दिला होता. सर्व भ्रष्टाचार कॉँग्रेसच्याच काळातील आहेत. मोदी सरकार मल्ल्याला आणत आहे. मुंबईच्या तुरुंगात तो उर्वरित आयुष्य घालवेल. कोणत्या कोठडीत राहील याचा व्हिडीओही आम्ही पाठवून दिला आहे. नीरव मोदी, मेहुल चौकसी आदी जे जे पळून गेले आहेत त्या सगळ्यांच्या मानगुटी पकडून देशात आणले जाईल.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनीही विचारला प्रश्न :
देशात आता विकासाचे राजकारण राहिले नाही. देशाला पुढे कसे नेणार आहोत. एका मुख्यमंत्र्याने मंदिराचा विषय उचलल्याने प्रत्येक ठिकाणी याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ध्रुवीकरण करण्याचा प्रकार करण्यात आला नाही काय? आम्ही मंदिराच्या विरोधात नाही हा धर्मनिरपेक्ष देश आहे, इथे सगळ्यांना जगायचे आहे.
उत्तर : राममंदिराचा मुद्दा ध्रुवीकरणाचा आणि राजकारणाचाही नाही. मंदिर व्हायला पाहिजे ही आमची सातत्याने मांडलेली भूमिका आहे. देशात जर चर्चा होणार असेल तर आम्ही शांत बसू शकत नाही. मंदिर होईल हे स्पष्ट सांगू. श्रीरामाने आम्हा सगळ्यांना मर्यादा शिकवली. गांधीजी स्वत:च रामराज्य यावे असे सांगत होते.
मुलाखत : रजत शर्मा
शब्दांकन : विकास झाडे