कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:14 IST2024-05-21T13:13:55+5:302024-05-21T13:14:36+5:30
दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत.

कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार
बलवंत तक्षक -
चंडीगड : हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार व अभिनेत्री कंगना रणौत ज्या ज्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या, त्या मंदिरांची स्वच्छता करणे आवश्यक आहे, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी केले आहे. दंग्र क्षेत्रातील टकोली गावातील एका प्रचारसभेत ते म्हणाले की, कंगना रणौत यांच्या आहारविषयक सवयींबाबत सोशल मीडियामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील देव समाजातील लोक खूप दुखावले गेले आहेत.
कंगना दोन दगडांवर पाय ठेवून उभ्या आहेत...
हिमाचल प्रदेशमध्ये देव समाजाची संस्कृती महत्त्वाची असून, तिच्या विरोधात काही गोष्टी सुरू आहेत. या समाजाला बदनाम करण्याचेही प्रयत्न होत आहेत. अशी कृत्ये करणाऱ्यांचा निवडणुकीत पराभव होणार हे निश्चित आहे.
सिंह यांनी सांगितले की, रणौत या दोन दगडांवर पाय ठेवून उभ्या आहेत. त्यांचे एक पाऊल मुंबईत, तर दुसरे पाऊल हिमाचल प्रदेशमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना हार पत्करावी लागणार आहे. ४ जून रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांनंतर कंगना रणौत यांच्या हाती पुन्हा मुंबईला परत जाऊन फक्त चित्रपटात काम करणे इतकेच उरणार आहे.
काँग्रेसने केली निदर्शने
भाजप उमेदवार कंगणा रणौत यांना सोमवारी लाहौल व स्पिती येथे काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. या प्रकाराची हिमाचल प्रदेश भाजपने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली.
याप्रकरणी चौकशी करण्यात यावी व दोषी निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली. ‘कंगना रणौत परत जा,’ अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. रणौत यांनी दलाई लामा यांच्याबद्दल काही वादग्रस्त उद्गार काढले होते.