दहा दिवस आपल्या भावाच्या मृतदेहाशेजारी बसून होते भाऊ - बहीण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 09:53 AM2017-09-09T09:53:17+5:302017-09-09T10:03:01+5:30
घरातून घाणेरडा वास येऊ लागल्यानंतर शेजा-यांनी पोलिसांना फोन करुन काहीतरी गडबड असल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी येऊन तपासणी केली असता घरात मृतदेह पडला असून त्यातून दुर्गंध येत असल्याचं लक्षात आलं.
नवी दिल्ली, दि. 9 - दिल्लीमधील कृषी संशोधन संस्थेचे निवृत्त संशोधक 64 वर्षीय यशवीर सूद यांचा मृतदेह त्यांच्याच घरात आढळला आहे. मृतदेह अक्षरक्ष: सडलेल्या अवस्थेत मिळाल्याचं पोलिसांनी सागितलं आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांपुर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. धक्कादायक म्हणजे त्यांचा भाऊ आणि बहीण गेल्या दहा दिवसांपासून मृतदेहासोबतच राहत होते. त्यांनी याबद्दल कोणालाच काही कळवलं किंवा सांगितलं नव्हतं.
गुरुवारी सकाळी घरातून घाणेरडा वास येऊ लागल्यानंतर शेजा-यांनी पोलिसांना फोन करुन काहीतरी गडबड असल्याची शंका व्यक्त केली. पोलिसांनी येऊन तपासणी केली असता घरात मृतदेह पडला असून त्यातून दुर्गंध येत असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य पुढे आलेला नाही. पोस्टमॉर्टम करण्यासाठी 72 तास वाट पाहिली जाणार आहे. यानंतर पोस्टमॉर्टम करण्यासंबंधी विचार केला जाईल. पश्चिम दिल्लीमधील इंद्रपुरी येथील ही घटना आहे.
डीसीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवीर सूद निवृत्त झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची मोठी बहीण कमला आणि छोटा भाऊ हरिश राहत होते. दोघांचीही मानसिक स्थिती बिघडलेली आहे. पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. दिल्लीमधील इहबास येथे त्यांना भरती करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये त्यांच्या एखादा जवळचा नातेवाईक राहत असल्याची माहिती मिळालेली नाही. त्यांच्या कुटुंबातील काहीजण लंडनमध्ये राहतात. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितलं आहे की, '31 मार्च 2015 रोजी यशराज निवृत्त झाले होते. यानंतर आपल्या बहीण आणि भावासोबत कॅम्पसमध्येच काही दिवस ते राहिले. यानंतर त्यांना सरकारी क्वार्टरजवळील एका कॉलनीतील छोट्याशा घरात शिफ्ट करण्यात आलं होतं. एका खोलीत हे तिघे राहत होते'.
गुरुवारी सकाळी फिल्ड ऑफिसर सोनू याला दुर्गंधीचा वास आल्यानंतर त्याने पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी पोहोचल्यानंतर घराच्या खिडकीचा काही भाग तोडून स्प्रे केला. यानंतर पोलिसांनी घऱात घुसण्याचा प्रयत्न केला. गेटवर उभ्या असलेल्या यशवीर यांच्या बहिणीने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला असता, एक व्यक्ती आतमध्ये झोपला असल्याचं दिसलं. त्याच्या शरिरावरील सर्व स्किन गायब झाली होती. मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत होता. पोलीस सध्या तपास करत आहेत.