आणखी दहा गोरक्षकांची पोलिसांना ओळख पटली

By admin | Published: April 8, 2017 12:10 AM2017-04-08T00:10:02+5:302017-04-08T00:10:02+5:30

पेहलू खान यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी दहा गोरक्षकांची ओळख पटवली

Ten more Gorkhrs were identified by the police | आणखी दहा गोरक्षकांची पोलिसांना ओळख पटली

आणखी दहा गोरक्षकांची पोलिसांना ओळख पटली

Next


अलवार : पेहलू खान यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी दहा गोरक्षकांची ओळख पटवली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मुख्य आरोपी विपीन यादव, रवींद्र यादव व कालू राम यांना बुधवारी रात्री अटक झाली आहे. दुसऱ्या मुख्य गुन्हेगाराचे नाव राजेश असून, तो फरार आहे. प्रथम माहिती अहवालात सहा जणांची नावे असून, त्याशिवाय आम्ही त्या घटनेच्या व्हिडीओच्या आधारे आणखी दहा जणांची ओळख पटवली आहे, असे अलवारचे पोलीस अधीक्षक राहुल प्रकाश यांनी सांगितले.
प्रकाश म्हणाले, ‘विपीन यादव आणि राजेश हे मुख्य गुन्हेगार असून, त्यांनी व इतरांनी गायींची वाहतूक करणाऱ्यांना झोडपून काढले व त्यांच्या वाहनांची नासधूस केली. १ एप्रिल रोजी ६ पिकअप व्हॅन्समधून १६ लोक ३६ जनावरे घेऊन निघाली होती. ते जयपूरहून हरियाणाकडे निघाले होते. गोरक्षकांनी जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील बेहरोर येथे त्यापैकी दोन वाहनांना थांबवले त्यातील पाच जणांना त्यांनी झोडपून काढले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर सोमवारी रात्री पेहलू खान (५५) यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, स्वत:ला गोरक्षक म्हणवणारे जमाव हिंसाचार करून वेगवेगळ््या जाती आणि समाजात तणाव निर्माण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानसह ६ राज्यांना या गोरक्षक दलांवर बंदी का आणत नाही, याबद्दल म्हणणे मांडण्यास शुक्रवारी नोटीस बजावली. न्या. दीपक मिसरा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्यांकडून तीन आठवड्यांत या नोटीसला उत्तर मागितले आहे. अशा स्वयंघोषित गोरक्षक दलांवर बंदीची मागणी काँग्रेसचे नेते तेहसीन पूनावाला यांनी सार्वजनिक हिताच्या याचिकेद्वारे केली आहे.
>गायींचा गोशाळेत मृत्यू
भारतातील सर्वात मोठ्या आणि सधन अशा गोशाळेतील २५ टक्क्यांपेक्षा जास्त गायी गेल्या पाच महिन्यांत मरण पावल्या असून, राहिलेल्यांतील निम्म्या आजारी आहेत.
१२८ वर्षे जुनी ही कानपूर गोशाळा असून, गेल्या आठवड्यात चार गायी दगावल्या. डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की, उपासमारीमुळे त्यांचा जीव गेला. गायीला पवित्र मानणाऱ्या स्थानिक रहिवाशांत यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या गोशाळेत ५४० गायी होत्या. त्यातील १५२ मरण पावल्या.
ज्या संस्थेकडे या गोशाळेचे व्यवस्थापन आहे, तिच्याकडे २२० कोटींची मालमत्ता आहे. या संस्थेला कोट्यवधी रुपये या गोशाळेसाठी देणगी मिळतात. मग हे पैसे जातात कुठे याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे संस्थेच्या वरिष्ठ सदस्याने म्हटले आहे.
>नक्वींच्या माफीची मागणी
गायींची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीची स्वयंघोषित गोरक्षकांनी ठेचून हत्या केल्याचा इन्कार करणारे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी सभागृहाची दिशाभूल केली, म्हणून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी राज्यसभेत केली. काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांनी गुरुवारी राजस्थानातील अलवार जिल्ह्यात गोरक्षकांनी गायींची वाहतूक करणारे ट्रक्स अडवून लोकांना मारहाण केली त्यात एका मुस्लिमाचा मृत्यू झाला, असे सांगितले होते. त्यावर नक्वी यांनी अशी काही घटनाच घडली नाही, असे निवेदन केले होते. शुक्रवारी नक्वी यांनी मी गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसंदर्भात बोलत होतो. या राज्यांत अशी घटना घडली नाही, असे स्पष्टीकरण शुक्रवारी केले. अलवारमध्ये अशी घटना घडलेली नाही व सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Ten more Gorkhrs were identified by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.