दहा अतिरेकी घुसले; देशभरात हाय अ‍ॅलर्ट!

By admin | Published: March 7, 2016 04:01 AM2016-03-07T04:01:21+5:302016-03-07T04:01:21+5:30

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे १० अतिरेकी घुसल्याची माहिती मिळताच गुजरातमध्ये राज्यव्यापी अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे

Ten terrorists infiltrate; High alert across the country! | दहा अतिरेकी घुसले; देशभरात हाय अ‍ॅलर्ट!

दहा अतिरेकी घुसले; देशभरात हाय अ‍ॅलर्ट!

Next

अहमदाबाद : केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे १० अतिरेकी घुसल्याची माहिती मिळताच गुजरातमध्ये राज्यव्यापी अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कच्छ आणि अन्य ठिकाणी छापे घालण्यात आले असून, महत्त्वाच्या संस्था आणि संवेदनशील भागांत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. एनएसजीच्या चार चमूही तयार ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिल्लीसह महाराष्ट्रातही हाय अ‍ॅलर्ट जारी करतानाच सर्व महत्त्वाच्या संस्थांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार(एनएसए) नासीर खान जनुजा यांनी भारताचे एनएसए अजित डोवाल यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गुजरातमध्ये हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला. अधिकाऱ्यांसह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीच्या पर्वावर राज्य सरकारने सर्व मुख्य मंदिरांभोवती सुरक्षा वाढविली आहे. दक्षिण कच्छमध्ये वरिष्ठ पोलीस अधीक्षक मार्कंड चौहान यांच्या नेतृत्वात भुज तालुक्यातील वारनोरा या गावी छापे मारून शोधमोहीम पार पाडण्यात


आली. पोलिसांनी भुजमधील नूरानी महाल हॉटेल आणि मुस्लीम जमात खानामध्येही छापा मारला. अतिरेक्यांनी गुजरातमध्ये प्रवेश केल्याची गोपनीय माहिती राज्य सरकारला केंद्र सरकारकडून शनिवारी मिळाली होती. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सर्व उपाययोजनांवर विचार केला जात असल्याचे गुजरातचे गृहराज्यमंत्री रजनी पटेल यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या संस्था आणि लष्करी प्रतिष्ठानांसह प्रमुख मॉल, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गुजरातमार्गे भारतात प्रवेश केलेल्या अतिरेक्यांनी दिल्लीला लक्ष्य ठरविले असण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी नाकारलेली नाही. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि विशेष सेलने त्याबाबत चर्चा केलेली नाही. सर्व गजबजलेल्या बाजारपेठा, मेट्रो स्थानकांवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे काम करीत आहेत की नाहीत,याची पोलीस खात्री करीत आहेत.
(वृत्तसंस्था)


हवाईदल केंद्राजवळ
संशयित तरुणास अटक
कोलकाता : वायुसेनेच्या पनागड बेस स्टेशनजवळ एका संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो संशयास्पद स्थितीत फिरत असताना गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गावकऱ्यांना दोन तरुण पनागड वायुसेनेच्या बेस स्टेशनजवळ संशयास्पद स्थितीत फिरत असताना आढळले. त्यातील एकाला अटक करण्यात आली असून, दुसऱ्याचा शोध सुरू असल्याचे वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नेमक्या याचवेळी गावातील एका पेट्रोल पंपाजवळ काही वाहनांना आग लागल्याची माहिती मिळाल्याने वायुसेनेच्या अग्निशमन दलाचे पथक आग विझविण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेस स्टेशनजवळ घातपाताचा कुठलाही प्रकार घडला नाही. संशयिताची ओळख अद्याप पटली नसून, चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वायुसेनेच्या विमानाचे अवागमन सहज व्हावे म्हणून पनागड बेस स्टेशनचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

कोलकाता विमानतळ उडवून देण्याची धमकी
कोलकात्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तासांत उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल धडकल्यानंतर तेथील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
जर्मनीवरून सदर विमानतळ व्यवस्थापकाच्या ई-मेल आयडीवर धमकी देणारा मजकूर मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळाच्या सायबर गुन्हे चमूने सदर ई-मेलमधील मजकुराची शहानिशा चालविली आहे.
संपूर्ण विमानतळाभोवती चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक विमानतळावर प्रवाशांचे सामान आणि कार तपासल्या जात आहेत.

Web Title: Ten terrorists infiltrate; High alert across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.