गडचिरोली जिल्ह्यात दहा हजार कोटींचा पोलाद प्रकल्प; जेएसडब्ल्यू स्टील कंपनी करणार गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 06:58 AM2023-11-15T06:58:32+5:302023-11-15T06:58:40+5:30
उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
-सुनील चावके
नवी दिल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी उद्योगपती सज्जन जिंदल यांची जेएसडल्ब्यू स्टील कंपनी दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित पोलाद प्रकल्पासाठीही जेएसडब्ल्यू स्टीलने पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिल्लीत 'लोकमत'शी बोलताना ही माहिती दिली. मंगळवारपासून प्रगती मैदानावर सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यासाठी सामंत आले होते.
पोलाद निर्मिती उद्योगात आघाडीचे स्थान असलेल्या जेएसडब्ल्यू स्टीलने पाच महिन्यांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड भागात लोहखनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी मिळविली होती. त्यापाठोपाठ जेएसडब्ल्यू स्टील गडचिरोली जिल्ह्यात दहा हजार कोटींच्या गुंतवणुकीतून पोलाद प्रकल्प उभारणार असून रायगड जिल्ह्यातही पाच हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे, असे सामंत यांनी सांगितले.
लोहखनिज उत्खननात गडचिरोली बनणार हब
सध्या गडचिरोलीत लॉयड मेटल अॅन्ड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ही एकमेव कंपनी खनिजांचे उत्खनन करीत आहे. एलएमईएलने २८ वर्षापूर्वी गडचिरोलीतील उत्खनन क्षेत्रात प्रवेश केला. मात्र पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळत नसल्याने अडचणी वाढल्या होत्या. गेल्याच वर्षी पर्यावरणासंबंधी मंजुरीची प्रक्रिया पार पडली. याआधी ३ दशलक्ष टनांची उत्पादन मंजुरी आता दहा दक्षलक्ष टनांपर्यंत वाढविण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी जाळपोळ करीत सरकारी आणि कंपन्यांच्या संपत्तीची नासधूस केल्याने या भागात कंपन्या येण्यास धजावत नव्हत्या. लोहखनिज उत्खननात सनफ्लॅग आयर्न अॅन्ड स्टील लिमिटेड, युनिव्हर्सल इंडस्ट्रिज इक्विपमेंट, ओम साईराम ॲन्ड अलॉय यासारख्या कंपन्यांनी गडचिरोलीतील खनिज उत्खननात रुची दाखविली आहे.
दररोज ५०० ट्रक खनिजांचे उत्खनन..
सुरजागड येथे सध्या दरदिवशी जवळपास ५०० ट्रक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्खनन केले जात आहे. त्याची चुरी तयार करून छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यात पाठविली जात आहे. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोहखनिज प्रकल्प निर्मितीचे काम अतिशय गतीने सुरू आहे. त्यासाठी या परिसरातील जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत.
नीलेश राणे यांच्यासोबत बॅनर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोरले बंधु किरण सामंत आणि नीलेश राणे यांच्यासोबतचे आपले बॅनर कोणाच्या खुर्चीखाली फटाके वाजविण्यासाठी लावलेले नाही. ते कार्यकर्त्यांनी लावले असून त्यावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रवींद्र फाटक यांचीही छायाचित्रे आहेत. राणे कुटुंबीयांशी तात्विक मुद्यांवरून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाले असतील. पण आमचे संबंध अतिशय सलोख्याचे होते आणि आहे. आपण नीलेश राणे यांना दहा दिवसांपूर्वी आपल्या मोठ्या बंधूंसोबत भेटलो. ही राजकीय भेट नव्हती, असे उदय सामंत म्हणाले.