CoronaVirus: चाचणीस नकार; हात धुण्याचा सल्ला; रुग्णालयांचा हलगर्जीपणा मुलाच्या जीवावर बेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 04:02 PM2020-04-01T16:02:26+5:302020-04-01T16:04:45+5:30
Coronavirus चार रुग्णालयांचा दाखल करुन घेण्यास नकार; हलगर्जीपणा जीवावर बेतला
श्रीनगर: कोरोनामुळे एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये घडली. कोरोनाबाधित धर्मगुरुच्या संपर्कात आल्यानं इदगाहमध्ये राहणाऱ्या मुलामध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्यामुळे त्यानं तातडीनं रुग्णालय गाठलं. एकाच दिवशी तो चार रुग्णालयांमध्ये गेला. मात्र जागा नसल्याचं कारण देत रुग्णालयांनी चाचणी करण्यास नकार दिला. घरीच राहण्याचा आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला मुलाला रुग्णालयांकडून देण्यात आला. योग्य वेळी उपचार न मिळाल्यानं या मुलाचा मृत्यू झाला.
मंगळवारी जमालची (नाव बदलण्यात आलंय) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याला शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात (एसकेआयएमएस) दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधी जवळपास दोन दिवस तो वडिलांसह काही रुग्णालयांमध्ये जात होता. मात्र त्याला दाखल करून घेण्यात आलं नाही. 'मी हात जोडून रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली होती. मात्र कोणीही माझं ऐकलं नाही,' अशा शब्दांत मृत मुलाच्या वडिलांनी साश्रू नयनांनी त्यांच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. सध्या ते आणि त्यांचं कुटुंब एसकेआयएमएस रुग्णालयात क्वॉरेंटाईनमध्ये आहे.
गेल्या महिन्यात १८ ते २२ दरम्यान एका धार्मिक कार्यक्रमात १० जमालनं धर्मगुरुसोबत हस्तांदोलन केलं होतं. काही दिवसांनी त्या धर्मगुरुंना कोरोना झाल्याचं निदान झालं. जमालमध्येही कोरोनाची लक्षणं दिसू लागली. त्याला ताप आला. २८ मार्चला त्याला एसएमएचएस रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयानं त्याला दाखल करुन घेण्यास नकार दिला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला सीडी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी त्याला तातडीनं रुग्णवाहिकेतून सीडी रुग्णालयात नेलं.
सीडी रुग्णालयानं त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. जवाहरलाल नेहरु मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला. रुग्णालयात पुरेशा खाटा नसल्याचं कारण त्यांनी सांगितलं. रुग्णालयांच्या या फेऱ्यांमध्ये जमील आणि त्याच्या कुटुंबाचा फार वेळ गेला. अखेर काल जमीलचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानं जमीलच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.