तीन राज्यांत विद्यार्थ्यांमुळे तणावाचे प्रसंग
By Admin | Published: April 6, 2016 10:38 PM2016-04-06T22:38:05+5:302016-04-06T22:38:05+5:30
श्रीनगर, जयपूर, हैदराबाद : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच राजस्थानात विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला
श्रीनगर, जयपूर, हैदराबाद : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच राजस्थानात विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला असतानाच याच प्रकरणी काश्मिरात विद्यार्थ्यांवर लाठीमार तर राजस्थानात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने परिस्थिती चिघळली आहे. भरीस भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या हैदराबाद विद्यापीठात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखल्यामुळे कॅम्पसमध्ये नव्याने तणाव निर्माण झाला आहे.
- श्रीनगर एनआयटीमध्ये केंद्रीय पथक दाखल
टी-२० विश्वचषक सामन्यात भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्यामुळे श्रीनगरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत(एनआयटी) तणाव निर्माण झाला आहे. बुधवारी दिल्लीहून येथे दाखल झालेल्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (एचआरडी) दोन सदस्यीय चमूने या अभियांत्रिकी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी तणावाच्या परिस्थितीबाबत सल्लामसलत केली.
असुरक्षिततेचे वातावरण बळावत असतानाच विद्यार्थ्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान काश्मीरबाहेरील विद्यार्थ्यांनी आक्रमक धोरण अवलंबत प्रशासनाला ४ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रात पाच मागण्या ठेवल्या आहेत. राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा मुद्दाही त्यात समाविष्ट आहे.
केंद्राचा विश्वास नाही
राज्य पोलिसांऐवजी सीआरपीएफकडे कॅम्पसची सुरक्षा पुरविण्यात आल्यामुळे केंद्र सरकारचा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यावर विश्वास उरला नसल्याचे संकेत मिळतात, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
दररोज लाठीमार
विद्यार्थ्यांवर दररोज लाठीमार केला जाणारा भारत हा जगातील बहुदा एकमेव देश असावा. काश्मिरात ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांना भाजप बदडून काढत आहे. देशात अन्यत्र ही घोषणा न देणाऱ्यांनाही हा पक्ष चोप देत आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
केंद्र संपर्कात
विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसी बळाचा वापर केला जाऊ नये यासाठी केंद्राने एनआयटी प्रशासनाशी सातत्याने संपर्क चालविला आहे, असे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
>>राष्ट्रविरोधी कारवायांचा मुद्दा...
संस्थेत राष्ट्रविरोधी कारवाया वाढल्या असून श्रीनगरमधील स्थानिक विद्यार्थ्यांच्या नव्हे तर काश्मीरबाहेरील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संस्थेत तणावाचे वातावरण असल्यामुळे मंगळवारी रात्री आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी एनआयटीतील परिस्थितीबाबत चर्चा केली.
> पोलिसांनी केलेला लाठीमार हा केंद्र सरकारचे डोळे उघडणारा असून पंतप्रधानांनी काश्मीर खोऱ्यात शिकणाऱ्या बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे आश्वासन द्यावे.
- विनोद पंडित. सर्वपक्षीय विस्थापित समन्वय समितीचे अध्यक्ष.
(काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था)
> राजस्थानात काश्मीरच्या नऊ विद्यार्थ्यांना अटक, निलंबन
जयपूर : राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील एका खासगी विद्यापीठाच्या वसतिगृहात झालेल्या संघर्षाच्या संदर्भात पोलिसांनी नऊ विद्यार्थी आणि एका वॉर्डनला अटक केली आहे. हे विद्यार्थी आणि वॉर्डन जम्मू-काश्मीरचे आहेत.
टी-२० विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यावरून या वसतिगृहाच्या खाणावळीत संघर्ष होऊन एक विद्यार्थी जखमी झाला होता.
या प्रकरणी अटक झालेल्या नऊ विद्यार्थ्यांसह १६ विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती मेवाड विद्यापीठाने बुधवारी दिली. या विद्यार्थ्यांची सोमवारी जामिनावर सुटका करण्यात आली होती. गेल्या महिन्यात याच विद्यापीठातील काश्मिरी विद्यार्थ्यांनी गोमांस शिजविल्याच्या अफवेवरून तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर चार काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. परंतु गोमांस शिजविल्याची अफवा पसरविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या घटनेचा तणाव निवळला नसताना क्रिकेट सामन्यावरून वाद झाल्याने तणावात भर पडली. (वृत्तसंस्था)
> हैदराबाद विद्यापीठात आंदोलनकर्त्यांना रोखले
हैदराबाद : हैदराबाद केंद्रीय विद्यापीठासमोर बुधवारी विविध संघटनांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या एका गटातर्फे कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना तणाव निर्माण झाला होता. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी खबरदारी म्हणून ताब्यात घेतले असतानाही त्यांनी बळजबरीने विद्यापीठात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रोफेसर व्ही. कृष्णा हे सुद्धा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या राव हटाव मागणीचे समर्थन करीत त्यावेळी सुरू असलेल्या शिक्षण परिषदेच्या बैठकीतून बाहेर पडले. ‘चलो एचसीयू’च्या आवाहनावरून हे विद्यार्थी एकजूट झाले होते. काही आंदोलनकर्ते विद्यार्थी विद्यापीठ परिसरातील मुख्य द्वारावरही चढले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत त्यांना प्रवेशापासून रोखले.
(वृत्तसंस्था)