इराण-सौदीदरम्यानचा तणाव चिघळला
By Admin | Published: January 5, 2016 12:33 AM2016-01-05T00:33:27+5:302016-01-05T00:33:27+5:30
शिया धर्मगुरूला मृत्युदंड देण्यात आल्याने सौदी अरब आणि इराणदरम्यानचा तणाव विकोपाला पोहोचला असून सौदी अरब आणि मित्र देशांनी इराणसोबतचे संबंध तोडले आहेत.
रियाध : शिया धर्मगुरूला मृत्युदंड देण्यात आल्याने सौदी अरब आणि इराणदरम्यानचा तणाव विकोपाला पोहोचला असून सौदी अरब आणि मित्र देशांनी इराणसोबतचे संबंध तोडले आहेत.
शनिवारपासून या दोन्ही देशांत शाब्दिक खडांजगीला सुरुवात झाली. सौदी अरबसोबत बहरीन आणि सुदाननेही आखात आणि अरब देशांमधील तेहरानच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तेहरानसोबतचे संबंध तोडले आहेत.
तेहारानमधील सौदीच्या दूतावास जाळण्यात आल्याच्या प्रकाराने संतापलेल्या सौदीने रविवारी उशिरा इराणसोबतचे संबंध तोडत इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ४८ तासांच्या आत सौदी अरब सोडण्याचे फर्मान जारी केले. सोबतच इराणसोबतचा सर्व हवाई संपर्क तोडला आहे. सौदी अरबमधील सर्व विमान कंपन्यांना इराणकडे आणि इराणहून सौदीत येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द आणि रोखण्यास सांगण्यात आले आहे.
बहरीन आणि सुदाननेही सोमवारी सौदीच्या पावलांवर पाऊल ठेवीत इराणशी संबंध तोडून टाकले. दरम्यान, सौदी अरब आणि इराण यांच्यातील पेच सोडविण्यासाठी रशियाने मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. सिरिया, येमेनसह मध्यपूर्वेतील (नैर्ऋत्य आशिया) संघर्षावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सौदी आणि इराणदरम्यान निर्माण झालेल्या पेचामुळे फसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देशांनी या दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. संयुक्त अरब अमिरातनेही राजदूत माघारी बोलावला आहे. अंतर्गत कारभारात तेहरान सातत्याने ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप सौदी अरबने केला आहे. अरबच्या बाबतीत इराणचा असाच आजवरचा इतिहास राहिला आहे, असे सौदीचे विदेशमंत्री आदेल अल-जुबेर यांनी म्हटले आहे. राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसह ८० सौदी नागरिकांनी इराण सोडले असून ते सोमवारी दुबईत दाखल झाले. सौदीच्या रणनीतीमुळे विभागीय तणाव चिघळेल, असे इराणने म्हटले आहे.
इराणचा सौदीवर आरोप
संबंध संपुष्टात आणण्याच्या सौदीच्या निर्णयामुळे त्याने शिया मौलवींची हत्या करून केलेल्या घोडचुकीपासून जगाचे लक्ष विचलित होणार नाही, असे इराणने म्हटले. मौलवींना मृत्युदंड देण्याच्या सौदीच्या निर्णयामुळे प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊन दहशतवादाला चालना मिळेल, असेही इराणने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
> सौदी अरेबियात शिया मौलवी शेख निम्र अल निम्र्र यांच्यासह ४६ जणांना मृत्युदंड देण्यात आला. या घटनेने प्रदेशातील धार्मिक फूट पुन्हा उघड झाली आहे. बहरीनपासून पाकिस्तानपर्यंत हजारो शिया निदर्शक रस्त्यावर उतरले, तर सुन्नी राजवट असलेले देश सौदीच्या समर्थनार्थ पुढे आले.
हा घटनाक्रम नवे राजे सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदी अरेबियाने आक्रमकता अंगीकारल्याचे अधोरेखित करतो. राजे सलमान यांच्या नेतृत्वाखालील सौदीने येमेनमधील शिया हुती बंडखोरांविरुद्धच्या आघाडीचे नेतृत्व केले, तसेच इराणने जागतिक सत्तांसोबत अणुकरार करूनही त्याचा तीव्र विरोध केला.