सीमेवर तणाव ! पाकिस्तानला अद्दल घडवा, बीएसएफ प्रमुखांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 05:49 PM2018-01-18T17:49:09+5:302018-01-18T18:41:12+5:30
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर तणाव सुरू आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. त्याच पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी लष्कराला पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवर तणाव सुरू आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तानकडून आतापर्यंत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत होतं. परंतु आता आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवरही शस्त्रसंधीचा भंग केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी लष्कराला पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय लष्करानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी त्यांचा प्रतिकार करा आणि त्यांना अद्दल घडवा, असं सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांनी आदेश दिले आहे.
ते म्हणाले, सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानकडून ब-याचदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल ए. सुरेशलाही हकनाक शहीद व्हावं लागलं आहे. सुरेशचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. सुरेशचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. बीएसएफचा कॉन्स्टेबल बंकरमध्ये असताना एक गोळी लागून तो शहीद झाला. यासारख्या युद्धजन्य परिस्थितीत तुम्ही याला occupational hazards समजू शकता. आम्ही आमच्या लष्कराला बुलेटप्रूफ हेल्मेट आणि जॅकेट दिले आहेत. परंतु सर्वांगाचं रक्षण करण्यासाठी जॅकेट अपुरे पडत आहेत, असंही के. के. शर्मा म्हणाले आहेत.
सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला मागच्या काही महिन्यात भारतीय लष्करानं अनेकदा चांगलीच अद्दल घडवली आहे. भारताच्या या धडक कारवाईचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला आहे. पाकिस्तानमध्ये आता डीजीएमओ स्तराच्या बैठकीवर विचारविनिमय सुरू आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारताला डीजीएमओ स्तराच्या बैठकीचे निमंत्रण देण्यावर पाकिस्तानात विचार सुरू आहे.
पाकिस्तानी सिनेटच्या संरक्षण समितीच्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार डीजीएमओ स्तराची बैठक घेण्यावर पाकिस्तान विचार करत आहे. पाकिस्तानकडून अद्यापपर्यंत तरी डीजीएमओ स्तराच्या बैठकीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव आल्यास वरिष्ठ पातळीवर योग्य निर्णय घेतला जाईल असे इंडियन एक्सप्रेस दिल्लीतील सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.