चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला देणार दिलासा; GSPचा दर्जा पुन्हा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:14 PM2020-06-19T15:14:12+5:302020-06-19T15:16:07+5:30
विशेष म्हणजे या तणावाच्या काळातही अमेरिका भारताशी असलेले व्यावसायिक संबंध वाढवण्याचा विचार करत आहे.
नवी दिल्लीः भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये लडाखच्या सीमेवर झालेल्या चकमकीनंतर उभय देशांतील संबंधात कटुता आलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधही बिघडले आहेत. विशेष म्हणजे या तणावाच्या काळातही अमेरिका भारताशी असलेले व्यावसायिक संबंध वाढवण्याचा विचार करत आहे. अमेरिकन सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, 'जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सी' (जीएसपी) अंतर्गत भारताचा पुन्हा समावेश केला जाऊ शकतो.
ते म्हणाले की, अमेरिका सध्या यासंदर्भात भारताशी बोलणी करत आहे. आम्ही अद्याप तसं केलेलं नाही, पण आता आम्ही याबद्दल चर्चा करत आहोत. आम्हाला भारताकडून योग्य प्रतिसाद आणि प्रस्ताव मिळाल्यास आम्ही तो दर्जा भारताला परत देऊ शकतो, असं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लीट्झर यांनी सिनेटच्या वित्त समितीच्या सदस्यांना सांगितले.
जीएसपी म्हणजे नेमकं काय?
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या दौ-यापूर्वी अमेरिकेच्या 44 प्रभावी खासदारांनी ट्रम्प प्रशासनाला भारताला जीएसपी व्यापार कार्यक्रमात ठेवण्याची मागणी केली होती. ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षी जूनमध्ये भारताला 'जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सी' (जीएसपी)मधून वगळले होते. जीएसपी अंतर्गत भारताने अमेरिकेबरोबर व्यापाराला प्राधान्य दिले होते. जीएसपी हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापार कार्यक्रम आहे, ज्याच्या लाभार्थी देशांना फायदा होतो. अशा देशांना अमेरिकेच्या हजारो उत्पादनांच्या निर्यातीपासून सूट देण्यात येत असते. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिट्झर यांना लिहिलेल्या पत्रात खासदार म्हणाले की, घाई करण्याऐवजी आम्हाला अमेरिकन उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी लागेल आणि छोट्या छोट्या अडचणी या मार्गाने येऊ नयेत, याचाही विचार करावा लागेल.
भारतातील कथित जास्त आयात शुल्कानं अमेरिका होता अस्वस्थ
विशेष म्हणजे अमेरिकेच्या सिनेटर मारिया कॅंटवेल यांनी आपल्या अमेरिकेतून भारतात जाणा-या सफरचंदांवर ७० टक्के आयात शुल्क लादल्याबद्दल निराशा व्यक्त केली होती. अमेरिकन सरकारने भारताकडून आकारलं जाणारं असं भरमसाट शुल्क कमी करण्यासाठी अमेरिकेनं काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर लेझर म्हणाले, 'आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. अमेरिका सध्या भारताशी मोठ्या व्यापार चर्चेत गुंतलेली आहे. आमची भारताशी मोठी चर्चा सुरू आहे. मला खात्री आहे की, आपण हे समजून घ्याल की आम्ही मुक्त व्यापार कराराकडे वाटचाल करीत आहोत. जर असे काही झाले तर ते आशियातही होईल. मोन्टानाचे सिनेटचे सदस्य स्टीव्ह डायन्स यांनी भारताकडून डाळींवर कथित आकारला जाणारा जास्त दराचा मुद्दा उपस्थित केला.