चार विधानसभा मतदारसंघांमुळे बीआरएसला टेन्शन, अद्याप उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 09:47 AM2023-10-25T09:47:25+5:302023-10-25T09:48:16+5:30
उमेदवारीवरून बीआरएसमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे.
हैदराबाद : सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) २१ ऑगस्ट रोजी ११५ उमेदवार जाहीर केले होते. मात्र, नरसापूर, गोशामहल, नामपल्ली या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये या पक्षाने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. जनगाव मतदारसंघातून राजेश्वर रेड्डी या उमेदवाराला बी फॉर्म देण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरून बीआरएसमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे.
उमेदवार जाहीर करण्यात व प्रचार मोहिमेला प्रारंभ करण्यात बीआरएसने आघाडी घेतली होती. मात्र, गोशामहलसह तीन मतदारसंघांमध्ये अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा न केल्यामुळे तेथील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. विद्यमान आमदारांपैकी बहुतांश जणांना त्या पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, आठ विद्यमान आमदारांना बीआरएसचे अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी विधानसभा उमेदवारी दिलेली नाही.
नामपल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये एआयएमआयएम व काँग्रेस यांच्यात सरळ लढत होणार आहे. बीआरएस असा उमेदवार उभा करणार आहे जो काँग्रेसला नुकसानकारक व एआयएमआयएमला फायदेेशीर ठरू शकेल. पण, अजून त्या उमेदवाराचे नाव बीआरएसने निश्चित केलेले नाही. नरसापूर, गोशामहल या विधानसभा मतदारसंघांत देखील बीआरएसने अद्याप आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे त्या पक्षाचे कार्यकर्ते गोंधळले आहेत. (वृत्तसंस्था)
१०९ उमेदवारांना दिले बी फॉर्म
बीआरएसने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी १०९ जणांना बी-फॉर्म दिले आहेत. चारमिनार, याकूतपुरा, चंद्रयानगुट्टा, कारवान, मलकपेट आणि बहादूरपुरा या मतदारसंघांत बीआरएसने उमेदवार जाहीर केलेले असले, तरी त्यांना अद्याप बी-फॉर्म दिलेले नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकांत या जागांवर एआयएमआयएमचे उमेदवार निवडून आले होते.