उधमपूरमधील ट्रक हल्ला, क्लीनरच्या मृत्यूमुळेच काश्मीरमध्ये तणाव
By Admin | Published: October 19, 2015 03:53 PM2015-10-19T15:53:17+5:302015-10-19T15:53:17+5:30
उधमपूरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन जमावाने केलेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात गंभीररित्या भाजलेल्या ट्रक क्लीनरचा मृत्यू झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १९ - उधमपूरमध्ये गोहत्येच्या संशयावरुन जमावाने केलेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात गंभीररित्या भाजलेल्या ट्रक क्लीनरचा मृत्यू झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात या तरुणाचा दफनविधी पार पडला असला तरी काश्मीर घाटीत ब-याच ठिकाणी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली.
अंनंतनागमधील रहिवासी असलेला जाहिद रसूल हा ट्रक क्लीनर म्हणून काम करत होता. १० दिवसांपूर्वी जाहिद व ट्रक चालक शौकत अहमद हे दोघे ट्रक घेऊन काश्मीरला निघाले होते. मात्र यादरम्यान जमावाने गोहत्येच्या संशयावरुन या ट्रकवर हल्ला केला व पेट्रोल बॉम्ब टाकून ट्रक पेटवून दिला. यात जाहिद आणि शौकत हे दोघेही गंभीररित्या भाजले होते. जाहिदवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जाहिदच्या मृत्यूनंतर फुटिरतावादी संघटनांनी आज (सोमवारी) काश्मीर बंदची हाक दिली. सोमवारी विमानाने जाहिदचे पार्थिव काश्मीरमध्ये आणण्यात आले. जाहिदच्या मूळगावी त्याच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले. कुलगाम येथे आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झडप झाली. काश्मीरमधील विविध भागात रास्ता रोको तसेच रेल रोकोही करण्यात आला. काश्मीर घाटीतील आठ गावांमध्ये संचारबंदीसारखी स्थिती आहे.