काश्मीरमध्ये तणाव कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 01:02 AM2016-04-14T01:02:00+5:302016-04-14T01:02:00+5:30
सुरक्षा दले आणि निदर्शक यांच्यात बुधवारी उडालेल्या भीषण संघर्षात आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढला आहे. मंगळवारी
श्रीनगर/नवी दिल्ली : सुरक्षा दले आणि निदर्शक यांच्यात बुधवारी उडालेल्या भीषण संघर्षात आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तणाव वाढला आहे. मंगळवारी लष्करी जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्यामुळे खोऱ्यात पसरलेला तणाव पाहता काही जिल्ह्णांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला.
मंगळवारच्या गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी दु्रगमुल्ला येथे हजारो लोकांनी निदर्शने केली. यावेळी सुरक्षा दलांवर तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगविण्यासाठी जवानांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी उडालेल्या संघर्षात जहाँगीर अहमद वाणी हा युवक नळकांडी डोक्यावर फुटल्यामुळे जागीच ठार झाला. अन्य दोन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी कुपवाडाच्या हंदवाडा येथे कथित विनयभंगाच्या घटनेनंतर निदर्शने करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन युवक ठार तर पाच जण जखमी झाले होते. जखमींपैकी एका ५५ वर्षीय महिलेचा बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने श्रीनगर व कुपवाडा जमावबंदी लागू करण्यात आली.