सशस्त्र पोलिसांमुळे खोऱ्यात तणाव; काश्मिरात मोठी कारवाई होण्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 03:15 AM2019-08-04T03:15:47+5:302019-08-04T06:44:11+5:30
भाजीपाला, अन्नधान्य, पेट्रोलसाठी रांगा, एटीएममधून पैसे काढण्यासाठी गर्दी
श्रीनगर/नवी दिल्ली : काश्मीर खोºयात प्रचंड प्रमाणात सशस्त्र पोलीस पाठविण्यात आल्यामुळे तिथे तणाव वाढला असून, काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या भीतीने भाजीपाला, अन्नधान्य, तसेच पेट्रोल खरेदीसाठी शनिवारी प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आणि बँका व एटीएममधून पैसे काढण्यासाठीही लोकांनी गर्दी केली. इतके सशस्त्र पोलीस कशासाठी आणले, हे केंद्र सरकार वा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट न केल्याने तिथे गोंधळाचे वातावरण आहे. लोकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
२५0 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत
पाकिस्तानच्या सीमेवरील विविध लाँच पॅडवर सध्या २00 ते २५0 दहशतवादी सज्ज आहेत आणि ते काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत, असे लष्करी अधिकाºयाने म्हटले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत गेले, तेव्हा या सर्व दहशतवाद्यांनी सीमेवरून हटविण्यात आले होते. इम्रान खान परतताच अतिरेकी पुन्हा लाँच पॅडवर आले आहेत, असे या अधिकाºयाचे म्हणणे आहे.
काश्मीरमधील शाळा व कॉलेजांना १0 दिवस सुट्टी देण्यात आली आहे, मेहबुबा मुफ्ती यांना घरातच कैद करून ठेवले आहे, पाकव्याप्त काश्मीरमधील वीज, पाणीपुरवठा व इंटरनेट सेवा पाकिस्तानने बंद केली आहे, अशा असंख्य अफवा काश्मीरमध्ये पसरल्या आहेत.
मात्र, सुरक्षेची उपाययोजना म्हणून सशस्त्र पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे, त्यामुळे जनतेने घाबरू नये आणि शांत राहावे, असे राज्यपाल म्हणाले. राज्यघटनेत बदल करून, काश्मीरचे त्रिभाजन करण्याच्या वा ३७0, तसेच ३५ (अ) कलम रद्द करण्याच्या बातम्यांविषयी आपणास काहीच माहिती नाही, असे राज्यपालांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला सांगितले. अर्थात हे केंद्र सरकारने संसदेत सांगावे, अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे.
सशस्त्र पोलीस दलाची संख्या वाढवण्यात आल्यामुळे काश्मीर खोऱ्यात अस्वस्थता आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स तसेच पीडीपीच्या नेत्यांची बैठक झाली. मेहबुबा मुफ्ती यांनी फारुख अब्दुल्ला यांचीही भेट घेतली. सध्याच्या तणावाच्या स्थितीत तेथील सारे प्रादेशिक पक्ष एकत्र आले आहेत. इतके सशस्त्र पोलीस नेमके कशासाठी पाठवले आहेत, ही माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी व काँग्रेससह अन्य पक्षांनीही केली आहे.
राज्यघटनेत बदल केला जाणार नाही आणि ३७0 व ३५ अ कलम रद्द केले जाणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले. पण तसे आश्वासन केंद्राने द्यावे, अशी प्रत्येक काश्मिरी जनतेची मागणी आहे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. केंद्र सरकारने त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारमधील काही वरिष्ठ अधिकारी मात्र लवकरच काही तरी मोठे काश्मीरमध्ये घडू शकते, असे सांगत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
तीन दहशतवाद्यांचा सशस्त्र दलाकडून खात्मा
दहशतवाद्यांच्या काश्मीर खोºयातील कारवाया अद्याप सुरूच असून, शनिवारी सशस्त्र दलाने तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय जवान व दहशतवादी यांच्यात चकमक झाली आणि त्यात दोन अतिरेकी मारले गेले, असे पोलिसांनी सांगितले.
माछिल माता यात्राही रद्द
अमरनाथ यात्रेपाठोपाठ सरकारने माछिल माता यात्राही रद्द केली आहे. ही यात्रा २५ जुलै रोजी सुरू झाली असून, ती ५ सप्टेंबरपर्यंत चालणार होती. अमरनाथच्या यात्रेकरूंना आपापल्या राज्यात परतण्याच्या सूचना केंद्राने दिल्याने, रेल्वे व विमानांसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. लोकांना तिकिटे मिळण्यात अडचणी येत आहेत आणि तिथे राहणेही भीतीचे वाटत आहे. त्यातच माछिल यात्रेकरूंची भर पडली आहे.
परप्रांतीय विद्यार्थी परतले
काश्मीर खोऱ्यात शिक्षणासाठी गेलेल्या अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांनाही निघून जाण्यास सांगितले आहे. श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील अन्य राज्यांतील ४00 विद्यार्थ्यांना तेथून जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांच्यासाठी अनेक बसगाड्या आणून ठेवल्या होत्या.
पाकच्या ५ ते ६ घुसखोरांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरच्या सीमेवर केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीम अर्थात बॅटच्या पाच ते सात घुसखोरांना भारतीय लष्कराने शनिवारी रात्री कंठस्नान घातले असून देशात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी सांगितले. पाकच्या या टीममध्ये तेथील लष्करातील विशेष प्रशिक्षण घेतलेले जवान व अतिरेक्यांचा समावेश असतो.