जीसीटी सोडा, कर्नाटकात व्हीएसटीही द्यावा लागतो; भाजपाचे १६ आमदार सरकारवर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 03:48 PM2020-03-13T15:48:25+5:302020-03-13T15:51:19+5:30
मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर भाजपाचे आमदार नाराज
बंगळुरू: मध्य प्रदेशात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं काँग्रेस सरकार संकटात सापडलं असताना आता कर्नाटकातभाजपा सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपा आमदारांची नाराजी उघडपणे दिसून आली. भाजपाच्या १६ आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. आमदारांना मिळणारा विकासनिधी, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांचा सरकारमधील हस्तक्षेप यावरही आमदारांनी आक्षेप नोंदवला.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आयोजित केलेल्या बैठकीत १६ आमदारांनी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली. यामध्ये बसनगौडा यतनल, सिद्दू सवाडी, पौर्णिमा, राजू गौडा, शिवराज पाटील, अभय पाटील, कलकाप्पा बंडी यांचा समावेश आहे. एकाचवेळी १६ आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानं येडियुरप्पा यांना धक्का बसला. कोणत्या मतदारसंघाला किती विकासनिधी देण्यात आला याची यादी देण्यात येईल, असं त्यांनी आमदारांना सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत किनारपट्टी भागातल्या १२ आमदारांनी कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागून घेतली आहे. सरकारच्या कामावर हे आमदार नाराज आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताला एका आमदारानंदेखील दुजोरा दिला.
आम्ही मतदारसंघातल्या लोकांना तुमच्या भेटीसाठी आणल्यावर त्यांच्यासमोर तुम्ही आमच्यावर ओरडता. आम्हाला काही सन्मान आहे की नाही? त्यापेक्षा लोकांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी न आणलेलं बरं किंवा मग आम्हीच मुख्यमंत्र्यांपासून दूर राहायला हवं, अशा शब्दांत कर्नाटकच्या आमदारांनी येडियुरप्पा यांच्याकडे त्यांची नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकडून सरकारच्या कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा, त्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करणारं एक पत्रदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र विजयेंद्र सरकारी विभागांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. कर्नाटकात जीसीएटी सोबतच व्हीएसटीदेखील (विजयेंद्र सेवा कर) द्यावा लागतो, असा उल्लेख व्हायरल झालेल्या पत्रात आहे.