वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी राजा यांना जामीन मिळाल्याने तणाव, हैदराबादमध्ये निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:16 AM2022-08-24T00:16:11+5:302022-08-24T00:18:51+5:30
टी राजा सिंह यांनी यापूर्वीही अनेकदा वेळा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे...
पैगंबर मोहम्मदांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात न्यायालयाने आमदार टी. राजा सिंह यांना इशारा देत जामीन दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने त्यांना सर्वप्रथम 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला होता. मात्र नंतर, न्यायालयाने रिमांडचा आदेश मागे घेत त्यांना जामीन दिला. पोलिसांनी टी. राजा सिंह यांना हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात हजर केले होते.
तत्पूर्वी भाजपने टी. राजा यांना भाजपमधून निलंबित केले आहे. एवढेच नाही, तर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत 10 दिवसांत उत्तर द्यायला सांगितले आहे. पैगंबर मोहम्मदांवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी त्यांना मंगळवारी सकाळी अटक केली होती. टी. राजा सिंह हे हैदराबादमधील गोशामहल मतदार संघाचे आमदा आहेत.
टी. राजा सिंह यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153ए (विविध समूहांमध्ये शत्रुत वाढविणे), 295 (धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने पूजा स्थळाचा अपमान करणे अथवा ती अपवित्र करणे.) आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली होती.
यापूर्वीही अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य -
टी राजा सिंह यांनी यापूर्वीही अनेकदा वेळा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वर्षी जूनमध्ये हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. टी राजा सिंह यांच्याविरोधात हैदराबादचे रहिवासी मोहम्मद अली यांनी तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, टी राजा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये राजा सिंह अल्पसंख्याक समुदायाबद्दल अपमानास्पद बोलतांना दिसत होते. याप्रकरणी कांचनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.