नियंत्रण रेषेपाशी चीनने आणली अत्याधुनिक शस्त्रे; वाढला तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:43 AM2021-10-22T10:43:07+5:302021-10-22T10:43:37+5:30
चर्चेत ताेडगा निघत नसताना वाढली भारताची चिंता
बीजिंग : चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. सीमेजवळ अत्याधुनिक १०० राॅकट लाँचर तैनात केले आहेत. याशिवाय १५५ एमएम कॅलिबरच्या १८१ सेल्फ प्राेपेल्ड हाॅवित्झर ताेफा तैनात केल्या आहेत. एकीकडे दाेन्ही देशांतील चर्चांमध्ये ताेडगा निघत नसताना चीनच्या हालचालींमुळे भारताची चिंता वाढली आहे.
भारताने एलएसीजवळ एम ७७७ अल्ट्रा लाइट हाॅवित्झरसह लष्कराच्या तीन रेजिमेंट तैनात केल्या आहेत. त्याचे प्रत्युत्तर म्हणून चीनने ही तैनाती केली आहे. हिवाळ्यामध्ये हाडे गाेठविणाऱ्या थंडीमध्ये हिमालयातील सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे चीनचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये लष्कर माघारीवरून चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात कमांडर पातळीवरची चर्चा निष्फळ ठरली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांनी चीनने युद्धाचीही धमकी दिली हाेती. आता चीनने या प्रकारे तैनाती केल्यामुळे ड्रॅगनचे इरादे स्पष्ट हाेत आहेत.
राॅकेटची क्षमता ६५० किलाेमीटर
चीनने एलएसीवर पीएचएल ०३ लाँग रेंज मल्टिपल राॅकेट लाँचर यंत्रणा तैनात केली आहे. या राॅकेट लाँचरचे १० युनिट लडाखच्या सीमेजवळ तैनात करण्यात आले आहेत. एका युनिटमध्ये १२ लाँचर ट्युब असतात. राॅकेटची ६५० किलाेमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य वेधण्याची क्षमता आहे. ताशी १२ किलाेमीटर एवढा या राॅकेटचा वेग आहे. चीनने याशिवाय पीसीएल १९१ राॅकेट लाँचर तैनात केले आहेत. यंत्रणेची ३५० किलाेमीटरपर्यंत मारक क्षमता आहे. पीसीएल १८१ ट्रक माउंटेड हाॅवित्झर आणि सेल्फ प्राेपेल्ड हाॅवित्झरची तैनाती लडाखजवळच्या सीमेवर केली आहे.
भारताची यंत्रणाही झाली आहे सज्ज
भारताने चीनला उत्तर देण्यासाठी हेराॅन १ आणि एएलएच ध्रुव हेलिकाॅप्टरचा समावेश एव्हीएशन ब्रिगेडमध्ये केला आहे. तसेच एल ७० विमानभेदी ताेफादेखील उंच पर्वतरांगांवर सज्ज केल्या आहेत. चीन ताेफांचा सामना करण्यासाठी रणगाडाभेदी क्षेपणास्त्राचीही तैनाती भारताने केली आहे. दाट धुक्यांमध्येही शत्रूच्या रणगाड्यांचा वेध घेण्यास क्षेपणास्त्र सज्ज आहे.