चीन-भारत सीमेवरील तणाव निवळला; अखेर चीनची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:28 AM2020-06-10T07:28:31+5:302020-06-10T07:29:19+5:30
मुत्सद्देगिरीला आले यश : उभय देशांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचा परिणाम
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र, दोनच दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम मंगळवारी पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकले आहे. चिनी सैन्याने त्यांची वाहनेदेखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानेदेखील आपले काही जवान मागे घेतले आहेत.
लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता लडाखमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे सरकले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबद्दलची माहिती दिली. चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर काही भारतीय जवानदेखील मागे सरकले. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि हॉट स्प्रिंग परिसरातून अडीच किलोमीटर मागे गेल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यानंतर भारतानेही काही जवानांना माघारी बोलावले.
सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाºयांची एक महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये संवादाच्या माध्यमातून सीमा वाद सोडवण्यावर एकमत झाले. मात्र, यानंतर सोमवारी चीनने कोणतीही सकारात्मक पावले टाकली नाहीत. उलट युद्धाभ्यास सुरू करीत भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पूर्व लडाखमधील गलवान भागातून चिनी सैन्य मागे हटले आहे. गलवानमध्येच भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर आता दोन्ही देशांनी या भागातील सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात केली. सोमवारी रात्रीपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. चीनने सैन्य हटवल्याने भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जवानांना परतण्याचे आदेश दिले.
माघार कशामुळे?
जगभर फैलावलेल्या कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनवर अमेरिकेसह सर्व जगभरातून टीका केली जात आहे. कोरोना व्हायरससाठी चीनला दोषी ठरवले जात आहे. त्यातच चीनने भारत सीमेवर जास्तीचे सैन्य तैनात केल्यामुळे जगभरात आणखी नाचक्की होईल, यामुळे चीनने त्यांचे सैन्य माघारी घेतले. या प्रकरणात भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेही चीनने नरमाईचे धोरण अवलंबले आहे, असे समजले जात आहे.