CAA: पाकिस्तानमधून दहावी, अकरावी भारतातून; 12 वीच्या परीक्षेला बसण्यावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 08:57 AM2020-01-02T08:57:01+5:302020-01-02T09:01:21+5:30
पाकिस्तानच्य़ा सिंध प्रांतातील मीरपुरखासची रहिवासी दामी हीने दहावीची परीक्षा तेथील सरकारी शाळेतून दिली होती.
जयपूर : सीएए कायद्याला देशभरातून विरोध होत असताना जयपूरमध्ये एका विद्यार्थीनीचे भविष्य धोक्यात आले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात शरणार्थी बनून आलेल्या मुलीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या मुलीने दहावी पाकिस्तानातून उत्तीर्ण तर अकरावी भारतातील जोधपूरमधून उत्तीर्ण केली आहे. मात्र, 12 वीचा फॉर्म भरल्यानंतर ती परिक्षेला बसू शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानच्य़ा सिंध प्रांतातील मीरपुरखासची रहिवासी दामी हीने दहावीची परीक्षा तेथील सरकारी शाळेतून दिली होती. सिंध प्रांतामध्ये वाढलेल्या अत्याचारांमुळे त्यांनी भारतात शरण घेतली. जोधपूरला येऊन दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी अर्ज केला. त्यानंतर मुलीला जोधपूरमधील सरस्वती विद्या मंदिर शाळेतून विज्ञान शाखेला 11 वी ला प्रवेश मिळाला. 11 वी झाल्यानंतर १२ वी साठी अर्ज केला. पाकिस्तानमधील शाळा सोडल्याच्या दाखला, दहावीचे प्रमाणपत्रावर तिला प्रवेश मिळाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच 12 वी बोर्डाने तिच्याकडे पात्रता प्रमाणपत्रच नसल्याचे म्हणत परीक्षा नाकारली आहे.
दामीच्या वडीलांनी सांगितले की, ट्रान्सफर सर्टिफिकीट घेताच तेथील लोकांना संशय येतो, की इथून पळण्याच्या इराद्यात आहे. मग अत्याचार वाढू लागतात. यामुळे हे प्रमाणपत्र आणू शकलो नाही.
या प्रकरणावेळी सीएएची चर्चा होऊ लागल्यानंतर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांना यामध्ये भाग घ्यावा लागला. त्यांनी एका मुलाखतीत आणि ट्विटरवर सांगितले की, बोर्डाच्या नियमांनुसार दामीला परिक्षेला बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. या संबंधी बोर्डाने पाकिस्तानच्य दुतावासाला पत्रही पाठविले होते मात्र कोणतेही उत्तर आले नाही. राजस्थान सरकारने हा विषय गंभीरतेने घेतलेला असून तिच्या भविष्यासाठी 12 वीच्या परिक्षेला बसण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.