तात्या दहाव्यांदा; ‘जय’ हो पुन्हा मैदानात...

By Admin | Published: February 1, 2015 08:59 PM2015-02-01T20:59:02+5:302015-02-02T00:25:32+5:30

माण तालुका : अनिल देसाई तिसऱ्यांदा मजूर-औद्योगिक-विणकरमधून उतरणार !

Tenth ten; 'Jai' again in the maidan ... | तात्या दहाव्यांदा; ‘जय’ हो पुन्हा मैदानात...

तात्या दहाव्यांदा; ‘जय’ हो पुन्हा मैदानात...

googlenewsNext

नितीन काळेल - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला अद्याप तीन महिने बाकी असतानाच माण तालुक्यात राजकीय धुरळा चांगला उडू लागला आहे. बंंकेचे संचालक व माजी आमदार सदाशिवराव पोळ हे दहाव्यांदा शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. तर आमदार जयकुमार गोरे मागील पराभवाचा कलंक पुसण्यासाठी पुन्हा मैदानात उतरणार; पण ते माण की खटाव तालुक्यातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते चाचपणी करीत आहेत. माणमधील दुसरे संचालक अनिल देसाई तिसऱ्यांदा मजूर-औद्योगिक-विणकर मतदार संघामधून रणांगणात असणार आहेत.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक माण तालुक्यात म्हटले तर एकतर्फीच असायची. असेच चित्र मागील २००७ पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत होते. पण, २००७ मध्ये माणच्या राजकारणात नवख्या असणाऱ्या जयकुमार गोरे आणि माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्यात सोसायटी मतदारसंघातून चुरशीची लढत झाली. अवघ्या काही मतांनी पोळ विजयी झाले. त्यावेळी तेथील निवडप्रक्रिया न्यायालयापर्यंत पोहोचली होती. म्हणूनच त्यावेळची निवडणूक माणच्या राजकारणात वेगळीच ठरली. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सुमारे आठ वर्षांनंतरही जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. यावेळी माण तालुक्यात आमदार गोरे यांचा वारू जोरात धावत असला तरी त्यांनी अनेकांना दुखावलेही आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना साथ देणारे आज त्यांच्याबरोबर नाहीत. तरीही पोळ तात्यांना ते आव्हान देण्यात कुठेच कमी पडणार नाहीत, हेही सत्य आहे. दुसरीकडे सदाशिवराव पोळ यांचा कोठेही गाजावाजा नसला तरी त्यांना मानणारा कार्यकर्ता आजही त्यांच्या बरोबरीने आहे. जिल्हा बँकेची निवडणूक लढविली तर त्यांची ही दहावी लढाई असणार आहे. सध्या सोसायटी मतदार संघातून माजी आमदार पोळ व आमदार जयकुमार गोरे यांचीच नावे समोर येत आहेत. दोघांनीही विविध गावच्या सोसायटीकडे लक्ष ठेवले आहे. दुसरीकडे वरकुटे मलवडी येथील व जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई हे तिसऱ्यांदा मजूर-औद्योगिक-विणकर मतदार संघातून उतरणार आहेत. मागील निवडणूक व जिल्हा बँकेतील सध्याचे सत्ताधारी पाहता त्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचे दिसत आहे. या उलट त्यांना मानणाऱ्या काही सोसायटी आहेत. तेथील मतदान कोणाला जाणार हेहीे महत्वाचे ठरणार आहे.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत असताना माणमधील विविध सोसायट्यांमध्ये ठराव कोणाचे होणार यावरच
बरेच कवित्व सुरू आहे.

१९७२ पासून संचालक ...
माण तालुक्याचे एकेकाळी किंगमेकर समजले जाणारे सदाशिवराव पोळ हे १९७२ पासून जिल्हा बँकेवर निवडून येत आहेत. चारवेळा बिनविरोध निवडून आले आहेत. एकेकदा अध्यक्ष व उपाध्यक्ष त्यांनी भूषविले आहे. यंदा ते दहाव्यांदा बँकेच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यांच्यासमोर आमदार गोरे की अन्य दुसरे कोण असणार, हे स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे.


माण की खटाव तालुक्यातून निवडणुकीत उतरणार हे स्पष्ट नाही. २००७ मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळी गावातील सोसायटी माझ्याकडे नव्हती. आता पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. आताच्या निवडणुकीसाठी माण तालुका मला सेफ आहे. मला येथे कोणाचेच आव्हान नाही. मी जिंकून येणारच आहे. पण, खटाव तालुक्यातून उभा राहायचे की माणमधून यावर विचार सुरू आहे.
- जयकुमार गोरे, आमदार


जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक दि. ५ फेब्रुवारीला घेण्यात आली आहे. त्यामध्ये काय तो निर्णय होईल. निवडणुकीत उतरलो तर दहाव्यांदा मी निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
- सदाशिवराव पोळ, संचालक जिल्हा बँक

‘रासप’चे काय होणार ?
राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून शेखर गोरे यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी पन्नास हजारांहून अधिक मते त्यांनी घेतली होती. बँकेच्या या निवडणुकीत ते उतरणार का? हे अद्याप स्पष्ट नाही. ते निवडणुकीत उतरले ते खरी रंगत येणार आहे.

Web Title: Tenth ten; 'Jai' again in the maidan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.