‘आधार’ जोडणीस ३१ मार्चपर्यंत मुदत, बँक खातेदारांना दिलासा, सरकारचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:03 AM2017-12-14T06:03:30+5:302017-12-14T06:03:38+5:30
बँक खाती ‘आधार’ क्रमांकाशी जोडून घेण्याची आधी ठरविलेली ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत केंद्र सरकारने बुधवारी तीन महिन्यांनी वाढविली. त्यामुळे आता ही जोडणी ३१ मार्च २०१६ पर्यंत करून घ्यावी लागेल.
नवी दिल्ली : बँक खाती ‘आधार’ क्रमांकाशी जोडून घेण्याची आधी ठरविलेली ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत केंद्र सरकारने बुधवारी तीन महिन्यांनी वाढविली. त्यामुळे आता ही जोडणी ३१ मार्च २०१६ पर्यंत करून घ्यावी लागेल.
अनेकांकडून आलेल्या निवेदनांचा विचार करून आणि रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून ३१ मार्च ही नवी मुदत ठरविणारी अधिसूचना काढण्यात आल्याचे वित्त मंत्रालयाने निवेदनात म्हटले.
नव्या निर्णयानुसार ही मुदत दोन प्रकारची असेल. नव्याने उघडलेल्या बँक खात्यांना जोडणीसाठी खाते उघडल्यापासून सहा महिन्यांची मुदत असेल. इतर खात्यांसाठी ती ३१ मार्च २०१८ असेल. जोडणी न केल्यास खाते बंद होण्याचा परिणामही याच दोन पद्धतीच्या मुदतीनंतर लागू होईल. या आधी शुक्रवारी सरकारने ‘पॅन कार्ड’ ‘आधार’शी जोडून घेण्याची मुदत ३१ डिसेंबरवरून ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढविली होती. सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत ३३ कोटींपैकी १४ कोटी ‘पॅन कार्ड’ ‘अधार’शी जोडली गेली आहेत. देशात ‘आधार’धारकांची संख्या सुमारे ११५ कोटी आहे.
‘आधार’ जोडणीच्या सक्तीला आव्हान देणाºया याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे गुरुवारी सुनावणी सुरू होणे अपेक्षित असताना, सरकारने जोडणीसाठीच्या मुदतीत हे नवे बदल केले आहेत.
या मुदतीत
बदल नाही
मोबाइल फोनचा नंबर ‘आधार’शी जोडण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०१८ हीच कायम असेल.विमा पॉलिसी, म्युच्युअल फंडाचे खाते, पीपीएफ खाते व सरकारी योजनांच्या लाभांसाठी उघडलेले खाते मात्र ३१ डिसेंबरपर्यंत जोडून घ्यावे लागेल.