भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 20:50 IST2024-11-15T20:50:39+5:302024-11-15T20:50:58+5:30
धनत्रयोदशीलाच ही कार खरेदी करण्यात आली होती. या कारचा नंबरही आला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ६ तरुणांचा मृत्यू झाला आहे. इनोव्हा हायक्रॉस पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळून हा अपघात झाला आहे. यात कारचा चेंदामेंदा झाला असून फोटोही भयावह आहे.
हा अपघात मध्यरात्री २ च्या सुमारास झाला आहे. सहा जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी आहे. धनत्रयोदशीलाच ही कार खरेदी करण्यात आली होती. या कारचा नंबरही आला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले आहे.
ओएनजीसी क्रॉसिंगवर एक कंटेनर उजव्या बाजुला वळत असताना बल्लूपूरहून वेगाने येत असलेल्या इनोव्हा हायक्रॉसने धडक दिली. यात कारच्या चिंधड्या झाल्या. ही धडक एवढी भयानक होती की दोन तरुणांचे शीर धडापासून वेगळे झाले. तर एका तरुणीचे डोके आदळून फुटले. हा अपघात एवढा भयानक होता की अनेकांच्या अंगावर शहारे आले होते.
या अपघातातील सर्वजण देहरादूनचेच असून १९ ते २४ वयोगटातील तरुण, तरुणी आहेत. अतुल अग्रवाल हा या गाडीचा मालक होता, त्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचे वडील फटाक्यांचे मोठे व्यापारी आहेत. एका बीएमडब्ल्यू कारसोबत रेसिंग सुरु होती, असाही संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. तसेच मद्य प्राशन केलेले किंवा सनरुफ बाहेर आलेले असावेत असेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर पोलिसांनी तपास करत असल्याचे म्हटले आहे.