Tamil Nadu On High Alert: श्रीलंकेमार्गे 6 दहशतवादी भारतात घुसले, हाय अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 11:12 AM2019-08-23T11:12:37+5:302019-08-23T11:24:37+5:30
श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादीभारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे हे दहशतवादी असून त्यांच्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात शिरलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी आणि पाच श्रीलंकेतील तमिळ मुस्लीम दहशतवादी आहेत. त्यांनी हिंदूंचा पेहराव केला असून ते राज्यभरात दहशतवादी कारवायांच्या तयारीत असल्याचेही म्हटले आहे. दहशतवादी संरक्षण संस्था, मंदिरं, पर्यटन स्थळावर हल्ला करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच किनारपट्टी भागात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मच्छिमारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतामध्ये याआधी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली होती. तसेच गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत याआधी 9 ऑगस्ट रोजी हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या आहेत.
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.